Why Aryan Khan not smile on camera : बॉलीवूडच्या किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सोशल मीडियावर नेहमी चर्चेमध्ये असतो. अनेकदा तो क्रिकेटच्या मैदानावर मॅच बघायला किंवा हॉटेलमध्ये जाताना दिसून येत असतो. दिग्दर्शक म्हणून सिनेविश्वामध्ये काम सुरू केलेल्या आर्यनच्या एका फोटोसाठी पापाराझी त्याच्या मागे धावत असतात. पण आर्यन हा कधीच त्यांना फोटोसाठी हसून पोझ देताना दिसून येत नाही. सोशल मीडियावर आर्यन खान कधीच का हसत नाही असा प्रश्न नेहमी विचारला जातो. यावर आता अभिनेता राघव जुयालने प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन हा त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये अगदी वेगळा असल्याचे मत राघवने व्यक्त केले आहे.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राघव जुयाल याने सिनेविश्वातील कामाचा अनुभव आणि आर्यन खानशी मैत्री याबाबत सांगितले आहे. राघवने गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवरील ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ (The Ba***ds of Bollywood) या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. यातील प्रभावी भूमिकेमुळे राघवचे कौतुक करण्यात आले होते. या वेब सिरीजची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने केले होते. या सिरीजमध्ये एकत्र काम केल्याने आर्यन व राघव यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आहे. आर्यन हा अतिशय चांगली व्यक्ती असल्याचे म्हणत राघवने त्याच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.

आर्यनला उगाच खोटं हसायला येत नाही – राघव

या मुलाखतीमध्ये राघव जुयालला, आर्यन खान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा कॅमेऱ्यासमोर का हसत नाही?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राघव म्हणाला, “आर्यनला उगाच खोटं हसायला येत नाही. त्याला कोणासमोर दिखावा करायलाही आवडत नाही. आर्यन जसा आहे, त्याला तसंच राहायला आवडतं आणि लोकांनी त्याला तसंच स्वीकारलं पाहिजे.”

राघव पुढे म्हणाला, “तो खूपच क्रिएटीव्ह, मनमोकळ्या आणि नम्र स्वभावाचा आहे. हाच त्याचा खरा स्वभाव आहे. खाजगी आयुष्यात आर्यन खूप वेगळा आहे. त्याला जर हसायचं नसेल, तर ती त्याची मर्जी आहे. घरी मात्र तो खळखळून हसत असतो, मजा करतो. आर्यन खूप विनोद आणि मज्जा-मस्ती करतो.”

शहनाजबद्दल काय म्हणाला राघव जुयाल?

याच मुलाखतीत राघव जुयाल याला अभिनेत्री शहनाज गिलबरोबरच्या नात्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राघव म्हणाला, “आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत. शहनाज माझ्यासाठी कुटुंबासारखी आहे. ‘भाईजान…’च्या शूटिंगवेळी आमची ओळख झाली होती आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे. आम्ही नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतो. तिला गरज पडल्यास मी तिच्याबरोबर असेन आणि मला गरज पडल्यास ती माझ्याबरोबर असेल. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि मला ती कायम तशीच ठेवायची आहे.”