Shruti Haasan didn’t visit salon for five years : श्रुती हासन ही तिच्या अभिनयाइतकीच ती बेधडक स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा यांसाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर असो किंवा मुलाखतींमध्ये, ती तिचे विचार नेहमीच स्पष्टपणे मांडताना दिसते. हटके फॅशन, वेगळी लाइफस्टाईल आणि स्वतःचे निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे श्रुती अनेकदा चर्चेत असते. आता तिने गेल्या पाच वर्षांपासून सलूनमध्ये पाऊलही ठेवले नसल्याचा खुलासा केला असून, तिच्या केसांची काळजी ती स्वतः घेत असल्याचा खुलासा श्रुतीने केला आहे.

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी अभिनेत्री श्रुती हासन नुकतीच तिच्या चाहत्यांशी ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमधून संवाद साधताना दिसली. या सत्रामध्ये चाहत्यांनी तिला तिच्या चित्रपटांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक प्रश्न विचारले. यावेळी श्रुतीने तिच्या किशोरवयातील एका निर्णयाबद्दल सांगितले आहे. तिच्या या निर्णयामुळे तिचे वडील व ज्येष्ठ अभिनेते कमल हासन प्रचंड नाराज झाले होते.

श्रुती हासनने बेली बटण पिअर्सिंग कधी केले?

एका चाहत्याने श्रुतीला नाभीमध्ये पिअर्सिंग केले आहे का आणि ते कधी केले, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना श्रुतीने सांगितले की, तिने वयाच्या १९व्या वर्षी बेली बटण पिअर्सिंग केले होते. हा निर्णय तिच्या बंडखोर स्वभावाचा भाग होता. “हो, मी बेली बटण पिअर्सिंग केले आहे. मी १९ वर्षांची असताना ते केले होते. त्यामुळे माझे अप्पा (कमल हासन) खूप रागावले होते,” असे श्रुतीने सांगितले. त्यासोबतच तिने स्वतःला ‘टीनएज रिबेल’, असेही संबोधले आहे.

५ वर्षे सलूनमध्ये गेली नाही श्रुती हासन

या प्रश्नोत्तराच्या वेळी श्रुती हासन ही काही वर्षांपासून सलूनमध्येच गेली नसल्याचा खुलासा तिने केला आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने तिला केसांची काळजी कशी घेते, असा प्रश्न विचारला. त्यावर श्रुतीने तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांची काळजी ती स्वतःच घेत असल्याचे सांगितले. तिने लिहिले, “किमान पाच वर्षांपासून तरी कोणत्याही हेअर सलूनमध्ये गेलेली नाही. शेवटचा २०१७ मध्ये केसांना रंग लावला होता. मी स्वतःच माझे केस कापते आणि त्यांची काळजीही स्वतःच घेते,” असा खुलासा श्रुतीने केला. तिची गॉथिक फॅशन स्टाईल आणि कमरेपर्यंत लांब असलेले काळेभोर केस हे तिच्या फॅशनची खास ओळख बनले आहेत.

श्रुती हासनचे चित्रपट कधी होणार रिलीज?

श्रुती हासनच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिचे नुकतेच ‘सिंग गीतम’ चित्रपटातील ‘एमाइंडी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याचे दिग्दर्शन सिंगीतम श्रीनिवास राव यांनी केले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राम चरण व जान्हवी कपूर यांच्या ‘पेड्डी’ चित्रपटामध्ये ती कॅमिओ भूमिकेत झळकली होती. ती ‘हेलल्लाल्लो’ या गाण्यात विशेष भूमिकेत दिसली होती. लवकरच श्रुती तमीळ दिग्दर्शक मायस्किन यांच्या ‘ट्रेन’ या चित्रपटात झळकणार असून, त्यामध्ये तिच्यासह विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच अभिनेत्री श्रुती हासन ही आकाशमलो ओका तारा या तेलुगू आणि सलार २ या बहुप्रतीक्षित चित्रपटांमध्ये झळकणार आहे.