Why Pooja Bhatt ended her 11-year-marriage : अभिनेत्री-दिग्दर्शिका पूजा भट्टने तिचा एक्स पती मनीष मखिजापासून विभक्त होण्यामागचं कारण सांगितलं आहे. तिने सांगितलं की, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद किंवा भांडणं नव्हती, पण एकटेपणाची भावना इतकी वाढली की अखेरीस तिने व तिच्या एक्स पतीने त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

विकी लालवानीशी संवाद साधताना पूजा भट्टने मनीष मखिजाबद्दल बोलताना सांगितलं की ‘पाप’ या तिने दिग्दर्शन केलेल्या पहिल्या चित्रपटाच्या कामादरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ऑगस्ट २००३ मध्ये गोव्यात एका खासगी समारंभात त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या ११ वर्षांहून अधिक काळानंतर, २०१४ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

पूजा म्हणाली की, त्यांच्या घटस्फोटाबद्दल लोकांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे तिच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी व्यक्ती होती. मात्र, तसं काहीही नव्हतं. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या अनेक मित्रांनी मला विचारलं, तुमच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत. मग तुम्ही विभक्त का होत आहात? तुझ्या आयुष्यात दुसरी कोणीतरी व्यक्ती आहे का? माझं उत्तर ‘नाही’ असं होतं. माझ्या आयुष्यात दुसरी कोणतीही व्यक्ती नव्हती. मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला कारण त्या नात्यात मला खूप एकटेपणा जाणवत होता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत राहत असता आणि तरीही स्वतःला एकटं वाटत असेल, तेव्हा ते नातं खऱ्या अर्थाने नातं राहात नाही. एकाच छताखाली राहताना हळूहळू तुम्ही एकमेकांपासून दूर जाऊ लागता. मी त्याला सांगितलं की आपलं नातं मैत्री आणि विश्वासावर सुरू झालं होतं. मी कधीही तुझ्यावर संशय घेतला नाही आणि पुढेही घेणार नाही. पण मला जाणवत होतं की हे नातं आता आधीसारखं राहिलेलं नाही. आपण एकमेकांना हरवून बसलो होतो आणि त्या प्रवासात कुठेतरी मी एक स्त्री म्हणून स्वतःलाही हरवून बसले होते. मला माझं स्वतःचं अस्तित्व पुन्हा मिळवायचं होतं. लग्न टिकवून ठेवणं म्हणजे खोटं वागणं झालं असतं आणि मी खोटं आयुष्य जगू शकत नाही,”

पूजा म्हणाली की, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः स्वीकारणं हा त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामागील एक महत्त्वाचा भाग होता. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती. माझ्या दुःखासाठी किंवा असमाधानासाठी मी उरलेलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्या व्यक्तीला दोष देत घालवणार नव्हते.”

पूजाने पुढे सांगितलं की तिचं लग्न न टिकण्यामागे तिला मूल नको होतं हे ही कारण होतं. पूजा म्हणाली, “माझं वैवाहिक जीवन सुखी नसण्यामागील एक कारण म्हणजे मला मुलं नको होती. मला मुलं खूप आवडतात, पण आई बनण्याची तीव्र इच्छा कधीच मनात निर्माण झाली नाही. ३० असताना मी सतत काम करत होते आणि मला आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. पण आई होण्याची भावना माझ्या मनात कधीच आली नाही. मी माझ्या शरीराचं आणि अंतर्मनाचा आवाजाचं ऐकलं.”