अभिनेता राजपाल यादवच्या अंतरिम जामीन अर्जावर सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालला काही अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच, त्याला १.५ कोटी रुपयांचा डीडी जमा करावा लागला. कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी राजपालची अद्याप सुटका करण्यात आलेली नाही. तो तुरुंगातच आहे. त्याला मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी तुरुंगातून सोडण्यात येईल. म्हणजेच राजपालला आजची रात्र तुरुंगात घालवावी लागेल.
नियमांनुसार सूर्यास्तानंतर कैद्याची तुरुंगातून सुटका होत नाही. कारण त्यावेळी कैद्यांची गणना केली जाते आणि नंतर सर्वांना त्यांच्या बॅरेकमध्ये बंद केलं जातं. राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर त्याचे वकील भास्कर उपाध्याय यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सविस्तर माहिती दिली.
राजपाल यादवने चेक बाउन्स प्रकरणात ५ फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे. राजपालच्या अंतरिम जामीन अर्जावर सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी झाली. त्यात कोर्टाने त्याला दिलासा दिला. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने राजपालला त्याच्या पुतणीच्या लग्नात जाण्यासाठी १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. पण, त्याला १८ मार्च रोजी न्यायालयात हजर राहावं लागेल.
किती पैसे जमा केले?
राजपाल यादवचे वकील भास्कर उपाध्याय यांनी आतापर्यंत त्यांनी किती पैसे जमा केले आहेत आणि अभिनेत्याची सुटका कधी होणार आहे हे सांगितलं. ते म्हणाले, “न्यायालयाने आमचा अंतरिम जामीन अर्ज स्वीकारला आहे आणि तो अटींसह मंजूर केला आहे. आम्ही आज सर्व औपचारिकता पूर्ण केली. मंगळवारी राजपाल यादव स्वतः तुमच्यासमोर हजर राहून आपली बाजू मांडतील. आज एकूण १.५ कोटी रुपये विरोधी पक्षाला ट्रान्सफर करण्यात आले. ७५ लाखांचा डीडी उच्च न्यायालयात आधीच जमा केला आहे. तसेच आधी १.९ कोटी दिले होते. त्यामुळे चित्रपटासाठी मूळ जे ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं, तेवढी रक्कम फेडली आहे. आता व्याज द्यायचे बाकी आहे.”
राजपाल यादवची सुटका कधी होणार?
“राजपाल यादव उद्या बाहेर येतील. आता कोर्टात पैशांबाबत काही चर्चा झाली नाही. पुढील सुनावणीत कोर्टाकडून जे आदेश देण्यात येतील, त्याचे आम्ही पालन करू,” असं वकिलांनी सांगितलं.
प्रतिवाद्यांचे वकील काय म्हणाले?
दरम्यान, प्रतिवादी मुरली प्रोजेक्ट्सचे वकील अवनीत सिंग सिक्का यांनी म्हटलं की, राजपाल यादव यांनी सोमवारी सकाळपर्यंत कोणतेही पैसे जमा केले नव्हते, ज्यामुळे सुरुवातीला न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. पण त्यानंतर तासभराने त्यांनी १.५ कोटी रुपये जमा केले. आज त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आणलेली नाही. पण लग्नासाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
राजपाल यादव किती पैसे देणार ते १८ तारखेला समजेल
प्रतिवाद्यांच्या वकिलांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, “या एफडी आम्ही वापरू शकत नाही, म्हणून त्यांना आमच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील, अशी आमची मागणी होती. म्हणून, त्यांनी आमच्या क्लायंटच्या खात्यात एका तासाच्या आत १.५ कोटी रुपये जमा केले. मग मी खात्यात पैसे आल्याची पुष्टी कोर्टात केली. त्यानंतर कोर्टाने राजपाल यादवला १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. राजपाल यादवला १८ मार्च रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ते स्वतः किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहू शकतात. आता, १८ मार्च रोजी कळेल की राजपाल यादव किती पैसे देतील.”
राजपाल यादवला कोणत्या अटीवर कोर्टाने जामीन मंजूर केला?
- राजपाल यादवचा पासपोर्ट न्यायालयात जमा राहील.
- राजपाल यादवला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही.
- राजपाल यादवला १ लाख रुपयांचा जामीन बाँड सादर करावा लागेल.
- १६ फेब्रुवारी रोजी राजपालने रजिस्ट्रार जनरल यांच्या नावाने २५ लाख रुपयांचा डीडी देखील आणला होता. तो डीडी देखील सादर करावा लागेल.
- राजपाल यादवला १८ मार्च रोजी न्यायालयात प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहावे लागेल.
