Mukesh Khanna on Marriage: मुकेश खन्ना हे विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांची कायमच चर्चा होताना दिसते. मुकेश खन्ना यांनी अनेक बॉलीवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.

याबरोबरच, त्यांनी काही मालिकांमध्येदेखील काम केले आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड सिनेमांमधून त्यांना जितकी लोकप्रियता मिळाली नाही, तितकी लोकप्रियता त्यांना टेलिव्हिजनवरून मिळाली. त्यांनी साकारलेल्या भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्या. शक्तिमान, भीष्म पितामह या त्यांच्या भूमिकांबद्दल आजही बोलले जाते.

मुकेश खन्ना ६७ वर्षांचे आहेत. ते आजही अविवाहित आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी प्रेम, लग्न, जोडीदार याबद्दल वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊ…

नुकतीच मुकेश खन्ना यांनी फिल्मी चर्चाला मुलाखत दिली. ते म्हणाले, “मला एकदा रवी चोपडा म्हणालेले की ज्याचे अनेक अफेअर असतात तोच पुरुष असतो, पण मी त्या गोष्टीशी सहमत नाही. त्या ग्रुपमध्ये सगळ्यांचे अफेअर होते, माझे नाही. मला वाटतं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी १० गर्लफ्रेंड असाव्यात असे काही नाही.”

“पण लोक यावर विश्वास….”

पुढे ते म्हणाले, “लोक म्हणतात की स्त्री ही पतीव्रता असली पाहिजे. पण, आजपर्यंत असे कोणी म्हटले आहे का की पुरुषांनीसुद्धा एकनिष्ठ असायला हवे. माझे हेच म्हणणे आहे; जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही वचनबद्ध आहात, पण लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणतात की मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो. त्यानंतर ते पत्नीचा विश्वासघात करतात, ही फसवणूक आहे.”

मुकेश खन्नांनी लग्न केले नाही, मात्र त्यांचा लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “लोकांना वाटते की माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही, म्हणून मी लग्न केले नाही. मात्र, हे खरे नाही. माझा लग्नसंस्थेवर इतरांपेक्षा जास्त विश्वास आहे. पत्नी सहजासहजी मिळत नाही, ती नशिबात लिहिलेली असते. लग्न होणे हे नशिबात असावे लागते.”

“प्रेम फक्त एकदाच होतं…”

प्रेमाबद्दल मुकेश खन्ना म्हणाले, “प्रेम फक्त एकदाच होतं, बाकी सगळं आकर्षण किंवा वासना आहे. जर तुम्ही एका व्यक्तीला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून दुसऱ्या व्यक्तीलाही तेच म्हणालात तर ती कृतघ्नता आहे.”

त्यांनी आतापर्यंत लग्न का केले नाही? यावर मुकेश खन्ना म्हणाले, “जर माझे लग्न व्हायचे असते तर ते केव्हाच झाले असते. ज्या स्त्रीबरोबर माझे लग्न होणार आहे, ती कुठे ना कुठे तरी आयुष्य जगत आहे. जेव्हा आमचे नशीब आम्हाला एकत्र आणेल, तेव्हा आमचे लग्न होईल. वय काय असते, मी तर ते मोजतही नाही”, असे वक्तव्य करत मुकेश खन्नांनी ते भविष्यात लग्न करूही शकतात असे सांगितले.