गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सोशल मीडियायावर तर याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अनुष्का किंवा विराट कोहलीकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नसल्याने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान आता अनुष्काचं एक जुनं वक्तव्य चांगलंच व्हायरल होत आहे. २०२१ मध्ये जेव्हा अनुष्का आणि विराटला वामिका नावाची मुलगी झाली तेव्हाच अनुष्काने तिच्या फिल्मी करिअरबद्दल वक्तव्य केलं होतं. यापुढे अनुष्का काही मोजकेच चित्रपट करेल अशा प्रकारचं वक्तव्य तिने केलं होतं. आता याचवरुन सीमी गरेवालच्या कार्यक्रमात अनुष्काने केलेलं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. आणखी वाचा : अजय देवगणच्या 'मैदान'च्या प्रदर्शनात येणाऱ्या अडचणींमुळे हताश झाले बोनी कपूर; म्हणाले "माझी झोप उडाली…" सीमी गरेवालच्या टॉक शोमध्ये अनुष्काने मूल झाल्यानंतर अभिनय सोडण्याविषयी भाष्य केलं होतं. याच मुलाखतीमध्ये तिने तिचं खासगी आयुष्य आणि लग्नाबाबतीतले विचार मांडले होते. अनुष्का म्हणाली, "लग्न ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, मी लग्न करणार आहे आणि लग्न झाल्यावर कदाचित मी चित्रपटात काम करणं थांबवेन." अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. २०१७ मध्ये अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीशी लग्नगाठ बांधली अन् २०१८ पासूनच अनुष्काने चित्रपटात काम करणं कमी केलं. २०२१ मध्ये वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने फारसे चित्रपटही साईन केलेले नाहीत, त्यामुळेच तिच्या या जुन्या वक्तव्याच्या आधारावर जर अनुष्काने दुसऱ्या बाळाला जन्म दिला तर यानंतर ती अभिनयातून निवृत्ती घेईल असे कयास लावले जात आहेत. अद्याप अनुष्काच्या गरोदर असण्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अनुष्काचा आगामी 'चकदा एक्सप्रेस'च्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा निश्चित झालेली नाही.