Yami Gautam Aditya Dhar Himachal Pradesh House Details: बॉलीवूडमध्ये सध्या यशस्वी जोडप्यांमध्ये यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. नुकतेच नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालेल्या या जोडप्याने आता मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मुंबई सोडून यामीच्या मूळ गावी हिमाचल प्रदेशात स्थायिक होण्याचा दोघांचा विचार असल्याची चर्चा आहे. लाइमलाइटपासून दूर राहून शांत आणि निवांत आयुष्य जगण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सिनेविश्वातील कामानिमित्त दोघेही मुंबईत ये-जा करत राहणार आहेत.
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, यामी गौतम आणि आदित्य धर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. यामीचे हिमाचल प्रदेशाशी आधीपासूनच खास भावनिक नाते आहे. तिचा जन्म हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झाला असून ती अनेकदा आपल्या मूळ गावी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवताना दिसते. आता यामी आणि आदित्य यांनी हिमाचलमध्येच कायमस्वरूपी राहण्याचे ठरवल्याचे म्हटले जात आहे.
१०० वर्ष जुने हेरिटेज घर अन्…
यामी गौतमने लग्नाआधी मंडी जिल्ह्यातील गोहर येथे २५ एकर जमिनीवर असलेले सुमारे १०० वर्ष जुने हेरिटेज घर खरेदी केले होते. या घराचा तिच्या कुटुंबाशी आणि बालपणीच्या आठवणींशी भावनिक संबंध आहे. याच घरात यामी आणि आदित्य यांनी ४ जून २०२१ रोजी लग्न केले होते. सुंदर असे जुन्या पद्धतीचे त्यांचे घर असून ते लाकूड व दगडांनी बांधलेले आहे. घराच्या आजूबाजूला बाग असून यामध्ये सफरचंद, बटाटे, आलूबुखारा यांची शेती केली जाते.

यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी त्यांच्या घरातील हे जुनेपण आजही जपले आहे. या घराला आलिशान सेलिब्रिटी होममध्ये बदलण्याऐवजी त्यांनी घराचा साधेपणा कायम ठेवला आहे. याआधीही काम संपल्यानंतर ते या घरामध्ये राहण्यासाठी येत होते. पण, आता यामी व आदित्य यांनी कायमस्वरूपी हिमाचलमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २: द रिव्हेंज’च्या यशानंतर आदित्य धर हे इंडस्ट्रीतील चर्चेतील दिग्दर्शक बनले आहेत. मात्र, ते फार कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसतात. नुकतंच गुजरातमधील एकतानगर येथे झालेल्या नॅशनल फिल्म अवॉर्ड सोहळ्यात यामी आणि आदित्य एकत्र दिसले होते. ‘आर्टिकल ३७०’साठी यामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर आदित्य यांनाही या चित्रपटासाठी निर्माते म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
