मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे उत्तम अभिनयकौशल्य असूनही त्यांना चांगल्या किंवा मनासारख्या भूमिका मिळत नाहीत. त्यामुळे काही कलाकार इंडस्ट्री सोडण्याचाही निर्णय घेतात. अभिनेत्री यामी गौतमनेही एकेकाळी बॉलिवूडला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.
यामी गौतमने बॉलिवूड सोडून हिमाचल प्रदेशातील तिच्या मूळ गावी परत जाण्याचं ठरवलं होतं. तिच्या या निर्णयाला कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर एका रात्रीत तिचं नशीब पालटलं आणि तिने तिचा निर्णय बदलला.
‘विकी डोनर’मधून केलं होतं पदार्पण
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत यामी गौतमने याबाबत खुलासा केला. ती म्हणाली की, ‘विकी डोनर’ हा तिचा बॉलिवूडमधील पहिला हिट ठरलेला चित्रपट आहे, तरीही अनेकांच्या मते तिचा चित्रपट तितका यशस्वी ठरला नव्हता. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या दबावामुळे काही वेळा तिने मनविरुद्ध जाऊनही भूमिका स्वीकारल्याचंही सांगितलं.
इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री यामी गौतम हिने सांगितलं की, एक वेळ अशी आली होती जेव्हा तिने बॉलिवूड सोडण्याचा विचार केला होता. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिला, “कधी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यामीने होकारार्थी उत्तर देत त्या काळातील अनुभव सांगितला. यामी गौतम म्हणाली, “हो. उरी आणि बाला या चित्रपटांपूर्वी मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी हिमाचल प्रदेशमधील माझ्या गावी परतण्याचा विचार केला होता. तिथे आमची शेती आहे. मी पूर्णपणे वेगळं आयुष्य सुरू करण्याची कल्पनाही करून ठेवली होती. माझे आई-वडील खूप समजून घेणारे आणि पाठिंबा देणारे आहेत. त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं, घरी परत ये.”
स्वतःच्या अटींवर काम करते यामी गौतम
यामी गौतमने सांगितलं की, ज्या क्षणी तिने भीतीपोटी इंडस्ट्रीत टिकून राहण्याचा प्रयत्न करणं सोडलं, त्याच क्षणापासून तिच्या आयुष्यात सर्व काही बदललं. त्यानंतर तिला दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘उरी’ चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यानंतर ‘बाला’ हा चित्रपटही तिच्या वाट्याला आला. या दोन्ही चित्रपटांच्या यशामुळे यामीचं करिअर एका रात्रीत बदललं. यामी पुढे म्हणाली की, इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याच्या भीतीमुळे प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणणं तिने ज्या दिवशी थांबवलं, त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागले. यामीला अलीकडेच ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
