Dhurandhar 2 Release Date & Yami Gautam Review: दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता सर्वांच्या नजरा ‘धुरंधर २’ कडे लागल्या आहेत. जगभरात १,३५४.८४ कोटींहून जास्त कमाई करणाऱ्या धुरंधर चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘धुरंधर २’ रिलीज व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. ‘धुरंधर २’ बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय. अशातच बॉलीवूड अभिनेत्री व आदित्य धरची पत्नी यामी गौतम हिने ‘धुरंधर २’ कसा आहे, ते सांगितलं आहे.

यामी गौतमने ‘धुरंधर २’ चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहून थक्क झाल्याचं तिने सांगितलं. ‘न्यूज१८’शी बोलताना तिने पती आदित्य धरचे कौतुक केले. “माझ्या पतीने ‘उरी’सारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत. नुकताच त्याने ‘धुरंधर’ बनवला. असा चित्रपट बनवण्याची जिद्द त्याच्यात होती, म्हणूनच हा चित्रपट तयार होऊ शकला,” असं यामी गौतम म्हणाली.

यामी गौतमने पाहिला ‘धुरंधर २’

यामी गौतमने ‘धुरंधर २’ पाहिल्याची माहिती दिली. “मी ‘धुरंधर २’ पाहिला आहे. हा जबरदस्त चित्रपट आहे. चित्रपट पाहून मी खूप भावूक झाले होते. त्या दिवशी मला फ्लाइट पकडायची होती, त्यामुळे मी आदित्यला काहीच बोलू शकले नाही. मला त्यानंतर दुसरी पटकथा वाचायची होती किंवा काहीतरी पाहायचं होतं, पण मी ते करू शकले नाही. मी फक्त बाहेर सुंदर सूर्यास्त पाहत होते आणि विचार करत होते की फ्लाइट लँड झाल्यावर मी आदित्यला काय बोलेन. मला माझा अनुभव व चित्रपट किती चांगला आहे ते सांगायचं होत. आदित्यचं आपल्या देशावर व प्रेक्षकांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे त्याने हा चित्रपट खूप कष्टाने तयार केला आहे. धुरंधर २ एक असा अनुभव असेल जो प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाही,” असं यामी गौतम म्हणाली.

यामी गौतम ‘धुरंधर २’ मध्ये असणार का?

१९ मार्चला तुझा एखादा चित्रपट प्रदर्शित होतोय का? असं यामी गौतमला विचारण्यात आलं. यामी हसत म्हणाली, “‘धुरंधर’बद्दलची कोणतीही माहिती आदित्यच देईल.” होस्टने तिला चिडवण्याचा प्रयत्न केल्यावर ती हसत म्हणाली, “इतरांप्रमाणेच माझीही त्या दिवशी चित्रपटगृहात एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे मी तुम्हा सर्वांना तिथेच भेटेन.”

पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल यामीने प्रतिक्रिया दिली. “मला याची खात्री आधीपासूनच होती. मी आधीही म्हटलं होतं की ‘धुरंधर’ असा चित्रपट आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल,” असं यामी गौतम म्हणाली.

‘आर्टिकल ३७०’चं शूटिंग करताना वाचली ‘धुरंधर’ची पटकथा

यामी म्हणाली, “मी ‘आर्टिकल ३७०’चं शूटिंग करताना पहिल्यांदा ‘धुरंधर’ची पटकथा वाचली. ती फक्त ४० पानांची होती, पण ती वाचून माझे डोळे भरून आले. मी काहीच बोलू शकले नाही, पण माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून आदित्यला समजलं की मला नक्की काय वाटत होतं. हा चित्रपट प्रामाणिकपणे बनवण्यासाठी त्याने किती मेहनत घेतली आहे, हे मला माहीत आहे.”

‘धुरंधर 2’ १९ मार्चला रिलीज होणार आहे. याचदिवशी यशचा ‘टॉक्सिक’देखील प्रदर्शित होतोय. त्यामुळे या दोन्ही चित्रपटात बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. यापैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.