Yami Gautam On Adinath Kothare: ऑक्टोबर महिन्यात अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये ‘नई नवेली’ हा सिनेमादेखील आहे. यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. ‘नई नवेली’च्या ट्रेलरवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
नई नवेली या सिनेमाचा जॉनर हा हॉरर कॉमेडी आहे. बालाजी मोहन यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी सिनेमाचे लेखन केले आहे. सिनेमात यामी गौतमबरोबरच राजेश दुबे, आदिनाथ कोठारे, सुनीता राजवार, मिता वशिष्ठ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

“अगदी तसेच समीकरण…”
आता नुकताच नई नवेली या सिनेमाचा एक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये यामी गौतम, आदिनाथ कोठारे यांनी एकत्रित हजेरी लावली होती. त्यावेळी यामीला विचारण्यात आले की, सेटवर आदिनाथ कोठारेबरोबर कसे समीकरण होते, त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? यावर यामी म्हणाली, “आमच्यात आता जसे बॉण्डिंग दिसत आहे, अगदी तसेच समीकरण सेटवरही होते.” त्यावर आदिनाथनेही होकार दिला. पुढे यामी म्हणाली, “मला यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली.”

या व्हिडीओवर अभिनेत्री अमृता खानविलकरने इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे; तर इतर अनेक चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत.

यामी गौतम, आदिनाथ कोठारेचा हा सिनेमा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाला प्रेक्षक गर्दी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आदिनाथ नई नवेली या सिनेमाबरोबरच आणखी एका मोठ्या सिनेमाचा भाग आहे. तो रामायण या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायण सिनेमात त्याने भरत ही भूमिका साकारली आहे. त्यामुळे आदिनाथ या दोन्ही सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.
