Yash on Ramayana Movie Ravan Role: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा सिनेमा ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कारण- सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

“मी मुलाला अगदी स्पष्टपणे सांगितलं की…”

‘रामायण’मध्ये अनेक लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. यामध्ये लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता यशचाही समावेश आहे. तो रावणाची भूमिका साकारणार आहे. यशला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण, त्याचा सात वर्षांचा मुलगा यथर्वचे मात्र तसे नाही. याचे कारण म्हणजे यश रामाची नाही तर रावणाची भूमिका साकारत आहे.

यशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की मी माझ्या मुलाशी यशर्वशी बोलत होतो, त्यावेळी त्याने मला विचारले की मी कोणाला पाठिंबा देऊ? माझा मुलगा त्याच्या आजी आजोबांकडून रामायणाची गोष्ट ऐकतच मोठा झाला आहे. त्याला रामायणाची कथा माहीत आहे.

तो पुढे म्हणाला, “मुलासाठी त्याचे वडील हेच त्याचे हिरो असतात. त्याला रामायणाची गोष्ट माहीत आहे. त्याने मला विचारलं की तुम्ही रावण आहात? तुम्ही रावण कसे असू शकता? तुम्ही तर राम आहात ना? त्यावर मी त्याला सांगितलं की हो, खऱ्या आयुष्यात मी राम आहे, पण चित्रपटात मी रावणाची भूमिका साकारत आहे. त्यावर तो म्हणाला की मग तुम्ही वाईट माणूस आहात. त्यानंतर मी त्याला चित्रपट आणि अभिनय म्हणजे काय हे समजावून सांगितलं. यशर्वने मला विचारले की मी कोणाला पाठिंबा द्यायचा? त्याचा तो प्रश्न खूप गुंतागुंतीचा होता. माझ्या चाहत्यांच्याही मनात हाच प्रश्न असू शकतो की यश ही भूमिका का साकारत आहे? विशेषतः सीताहरणासारख्या प्रसंगांमध्ये माझ्या पात्राला प्रेक्षकांनी पसंत करू नये, अशी अपेक्षा आहे.

पुढे तो म्हणाला, “मी मुलाला अगदी स्पष्टपणे सांगितलं की, आपण जेव्हा ही कथा ऐकतो, तेव्हा प्रत्येकाने रामाचंच अनुसरण करायला हवं. रावण दिसायला आकर्षक, श्रीमंत किंवा शक्तिशाली वाटू शकतो; पण शेवटी तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर प्रभू रामांच्या विचारांचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. मात्र, चित्रपटात तू मला पाठिंबा देऊ शकतोस.”

यथर्वने आणखी कोणता प्रश्न विचारला होता, याबद्दलही यशने सांगितले. तो म्हणाला, “मुलाने मला विचारले की तुम्ही मरता का? तुम्ही हरता का? त्यावर मी त्याला सांगितलं की मी फक्त ती भूमिका साकारत आहे. प्रत्यक्ष आयुष्यात ही गोष्ट वेगळी आहे. चित्रपटात काम करताना मी याचा विचार केला नव्हता. अर्थात, माझ्या चाहत्यांचा विचार माझ्या मनात होता. पण, माझ्या मुलाचा किंवा एक दिवस तो मला असे प्रश्न विचारेल याचा विचार केला नव्हता. हा अनुभव खूपच वेगळा होता. मी साकारत असलेलं हे केवळ एक पात्र आहे, हे त्याला कसं समजावून सांगायचं असा प्रश्न मला पडला, त्यामुळे त्याला हे नंतर समजेल असं मला वाटलं.”

दरम्यान, ‘रामायण’ हा सिनेमा ५ नोव्हेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.