Yash on wife Radhikas reaction to intimate scenes with Kiara Advani in Toxic: यश हा लोकप्रिय अभिनेता आहे. कन्नड सिनेसृष्टीत त्याचे विशेष योगदान आहे. ‘के.जी.एफ चॅप्टर १’ व ‘के.जी.एफ चॅप्टर २’ या सिनेमांतील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. या भूमिकांद्वारे त्याने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यश लवकरच टॉक्सिक (Toxic) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील काही बोल्ड सीन सध्या व्हायरल होत आहेत. त्याबद्दल अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले. तसेच, पत्नी राधिका पंडितची याबद्दल काय प्रतिक्रिया होती, हेही त्याने सांगितले.

“प्रत्येक जोडीदाराला या गोष्टीमुळे अस्वस्थ वाटेल..”

यशने नुकतीच ‘आप की अदालत’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी रजत शर्मा यांच्याशी संवाद साधताना सिनेमातील रोमँटिक सीनबद्दल त्याने वक्तव्य केले. पत्नीच्या प्रतिक्रियेबद्दल तो म्हणाला, “प्रत्येक जोडीदाराला या गोष्टीमुळे अस्वस्थ वाटेल. मी खोटं बोलणार नाही. प्रत्येक जोडीदाराला असंच वाटतं. पण, शेवटी प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे की, ही कला आहे. त्यातून आपण जे मिळवण्याचा प्रयत्न करतो, ते खूप वेगळं आहे.”

करिअरच्या सुरुवातीला त्यानं स्वत:साठी काही मर्यादा घालून घतल्या होत्या, आता त्या का ओलांडल्या, याबद्दलही त्याने सांगितले. तो म्हणाला, “लोक काही गोष्टी करतात. कारण- त्यांचा त्यावर विश्वास असतो. काही गोष्टींबद्दल त्यांना माहीत असते म्हणून त्या केल्या जातात. तर काही गोष्टी अशा असतात, ज्या पुढची पिढीही आदर्श मानते आणि त्यातून शिकते. त्यामुळे काही गोष्टींची नोंद होणं गरजेचं असतं आणि मला वाटतं की, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मीदेखील माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम केलं आहे. माझ्यासाठी अशा गोष्टी करणं सोपं नाही; पण या सिनेमाच्या गोष्टीसाठी ते करणं गरजेचं होतं. हा गोष्टीचा महत्त्वाचा भाग आहे.”

राधिकाच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता तो म्हणाला, “अर्थातच तिला हे आवडणार नाही; पण याचा अर्थ ती माझ्यावर नाराज आहे किंवा काहीतरी वेगळं आहे, असं नाही. कारण- तिचा माझ्यावर विश्वास आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्वतःही एक अभिनेत्री आहे. तिला हे समजतं की, हे माझं काम आहे आणि जेव्हा मी एखादी भूमिका साकारत असतो, तेव्हा अभिनेता म्हणून काम करीत असतो, तेव्हा तिचा पती म्हणून काम करत नसतो.”

यश सिनेमाबद्दल असेही म्हणाला, “टॉक्सिक हा सिनेमा Gen Z पीढीसाठी आहे. तरुण पिढीत ज्या चर्चा सुरू आहेत, आधीच्या पिढीबद्दल त्यांना ज्या समस्या आहेत, त्या सगळ्यांशी हा चित्रपट संबंधित आहे.”

दरम्यान, हा सिनेमा २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.