अभिनेता यश आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘Toxic: A Fairy Tale for Grown-Ups’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जवळजवळ सहा वर्षांनंतर, हा अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटासाठी पुन्हा एकदा चर्चेत आलेला दिसत आहे. चाहते त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आधी हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण तेव्हा सोशल मीडिया पोस्ट शेअर करत प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. Toxic च्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. अभिनेता यशच्या सोशल मीडियावर याबद्दलची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये म्हटलंय, “काही चित्रपट आपण फक्त बनवतो, पण काही चित्रपट आपल्याला सिनेमाच्या प्रेमात पडण्याची आठवण करून देतात. Toxic हा माझ्यासाठी असाच एक प्रवास राहिला आहे. ‘सिनेमाकॉन’मध्ये आमचा चित्रपट सादर करताना मिळालेला जागतिक प्रतिसाद पाहून आमचा विश्वास अधिक वाढला आहे की, हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास पात्र आहे.”

Toxic चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत पुन्हा बदल

यानंतर पोस्टमध्ये म्हटलंय, “Toxic चित्रपटाचे काम पूर्ण झाले असून, सध्या आम्ही जागतिक स्तरावर त्याचे वितरण करण्याचे नियोजन करत आहोत. हे सर्व लक्षात घेता, आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे ४ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्याऐवजी, संपूर्ण जगात एकाचवेळी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आम्ही लवकरच नवी तारीख जाहीर करू. या नवीन तारखेसह Toxic जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न

“आज जेव्हा भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करत आहे, तेव्हा आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून, मला ही एक मोठी संधी वाटते. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी हा चित्रपट अधिक चांगल्या पद्धतीने जगासमोर यावा, यासाठी आम्ही थोडा वेळ घेत आहोत.

यशने प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दल मानले जाहीर आभार

शेवटी यश प्रेक्षकांचे आभार मानत असं म्हणतो, “प्रत्येक वळणावर आणि बदलाच्या काळात तुमचा (प्रेक्षकांचा) पाठिंबा माझ्याबरोबर राहिला आहे, त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. काही गोष्टींसाठी संयम ठेवावा लागतो आणि हा प्रवासही तसाच आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, आम्ही तुम्हाला असा चित्रपट देऊ ज्याचा तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल आणि जो भारतीय सिनेमासाठी एक मानाचा क्षण ठरेल.”

Toxic हा चित्रपट आधी १९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र ही तारीख बदलण्यात आली. त्यानंतर पुन्हा पोस्टद्वारे ४ जून ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली. मात्र, आता ही तारीखही बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा वाट पहावी लागणार आहे.