Yogi Adityanath on Nana Patekar: नाना पाटेकर हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. काही वेळा त्यांच्या भूमिकांची, त्यांच्या सिनेमांची चर्चा होत असते. अनेकदा त्यांच्याबरोबर काम केलेले कलाकार अनुभव सांगतात; या सगळ्यामुळे नाना पाटेकर चर्चेत असतात. आता मात्र ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकर यांचे कौतुक केले आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत हे जाणून घेऊ…

“ते खूप संवेदनशील…”

उत्तर प्रदेश पोलिसांचे गाणे ‘खाकी का सितारा’ या गाण्याच्या लॉंचवेळी योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकरांचे कौतुक केले. ते म्हणाले, “नाना पाटेकर हे फक्त कलाकारच नाहीत, तर ते खूप संवेदनशील व्यक्तीही आहेत. जेव्हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत होते, त्यावेळी ज्या लोकांनी मदतीचा हात पुढे केला, त्यामध्ये नाना पाटेकर सगळ्यात पुढे होते.”

ते असेही म्हणाले की, जेव्हा नाना पाटेकर स्वत: येऊन भेटले, त्यांच्याबद्दल सांगितले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. योगी आदित्यनाथ म्हणाले, “मला खूप आश्चर्य वाटले की इतके मोठे अभिनेते असूनही ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. मात्र, हे खरे आहे. नाना पाटेकर कोणत्याही प्रचाराशिवाय किंवा दिखाव्याशिवाय त्यांचे काम करतात. त्यांनी उत्तर प्रदेश पोलिस सायबर सिक्युरिटी जागरूकता कॅम्पेनमध्येही योगदान दिले आहे, त्यासाठी त्यांनी एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. डिजिटल स्कॅमपासून लोकांना सावध करणे हा त्याचा उद्देश आहे. “

योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकरांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच, ‘खाकी का सितारा’ गाण्याला शंकर महादेवन यांनी आवाज दिला आहे, त्यांचेही त्यांनी कौतुक केले.

नाना पाटेकर यांनी आजपर्यंत अनेक सिनेमांत काम केले आहे. यामध्ये मराठीसह हिंदी सिनेमांचा समावेश आहे. त्यांनी संकल्प या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. अभिनयाबरोबरच ते ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातूनही काम करत असतात.

दरम्यान, आगामी काळात नाना पाटेकर कोणत्या भूमिकेत दिसणार, कोणत्या सिनेमात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.