Yogita Bali Life Story: बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री योगिता बाली यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनकथित पैलू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. १९७१ च्या ‘परवाना’ चित्रपटातून पदार्पण करत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि संजीव कुमार यांच्यासारख्या महानायक कलाकारांसोबत काम करणाऱ्या योगिता बाली यांनी ६० हून अधिक चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवला. मात्र, १९७६ मध्ये गायक किशोर कुमार यांच्याशी झालेला विवाह अवघ्या दोन वर्षांत घटस्फोटात बदलला. त्यानंतर १९७९ मध्ये त्यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्तींशी लग्न केले. श्रीदेवी यांच्यासोबत मिथुन यांच्या अफेअरच्या चर्चा असतानाही योगिता यांनी कुटुंब सांभाळत अभिनयातून संन्यास घेतला.

अभिनेत्री योगिता बाली यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५२ रोजी मुंबईत झाला. त्यांनी ७० आणि ८० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र, चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीच अधिक चर्चा रंगली. प्रेम, लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर अशा एका नात्याची सुरुवात, जे आजतागायत टिकून आहे.

योगिता बाली यांच्या करिअरची सुरुवात

योगिता बाली या चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. त्या प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांच्या पुतणी आहेत. त्यामुळे बालपणापासूनच त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध आला. त्यांनी अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यावर त्यांच्या सौंदर्याने लोकांना भुरळ घातली. १९७१ मध्ये ‘परवाना’ चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, देव आनंद, संजीव कुमार व सुनील दत्त यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली.

योगिता बाली यांचे गाजलेले चित्रपट

योगिता यांना बहुतांश चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांनी ६७ चित्रपटांमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘नागिन’, ‘महबूबा’, ‘चाचा भतीजा’, ‘जानी दुश्मन’ आणि ‘राजतिलक’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा ट्विस्ट आला.

किशोर कुमार यांची तिसरी पत्नी झाल्या योगिता बाली

१९७६ मध्ये योगिता बाली यांनी प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. किशोर कुमार यांचं हे तिसरं तर योगिता यांचं पहिलं लग्न होतं. त्या काळात या लग्नाची खूप चर्चा झाली. किशोर कुमार हे तेव्हा हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय गायक आणि कलाकार होते, त्यामुळे हे नातं चर्चेत येणं साहजिक होतं. मात्र, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. अवघ्या दोन वर्षांत म्हणजेच १९७८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर मिथुन चक्रवर्तींशी केलं लग्न

घटस्फोटाच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच १९७९ मध्ये योगिता बाली यांच्या आयुष्यात अभिनेता मिथुन चक्रवर्ती आले. त्यांनी लग्न केलं. नंतर योगिता आणि मिथुन यांनी हळूहळू आपलं आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवायला सुरुवात केली. लग्नानंतर योगिता इंडस्ट्रीपासून दूर गेल्या. १९८९ मध्ये आलेला ‘आखिरी बदला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, त्यानंतर त्यांनी पुन्हा अभिनय केला नाही.

मिथुन आणि योगिता यांच्या वैवाहिक आयुष्यात चढ-उतारांच्या बातम्या अनेकदा येत राहिल्या. मिथुन यांचं नाव अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबर जोडलं गेलं होतं. मात्र, योगिता यांनी आपलं कुटुंब सांभाळत संसार केला. योगिता आणि मिथुन यांना महाक्षय, उश्मय व नमाशी ही तीन मुलं आणि दिशानी ही एक मुलगी आहे. महाक्षय आणि नमाशी यांनी चित्रपटसृष्टीत कामही केलं आहे.