Why Actor Mayur Raj Verma Left India : बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून ‘यंग अमिताभ बच्चन’ नावाने घराघरांत पोहोचलेले आणि ‘महाभारत’ मालिकेत अभिमन्यूची अजरामर भूमिका साकारणारे मयूर राज वर्मा यांची कहाणी अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. आपल्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे बालकलाकार असलेल्या मयूर यांनी ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘लावारिस’ आणि ‘बेमिसाल’ यांसारख्या चित्रपटांतून मोठी लोकप्रियता मिळवली. मुख्य अभिनेता म्हणून संघर्ष करावा लागला तेव्हा स्वतः अमिताभ बच्चन यांनी त्यांना मोलाचा मार्ग दाखवला. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच ग्लॅमरस जग सोडत ते यूकेमध्ये स्थायिक झाले आणि आज ब्रिटनमध्ये अत्यंत यशस्वी रेस्टॉरंट व्यावसायिक म्हणून आयुष्य जगत आहेत.

बालपण आणि अभिनयातील पदार्पण

नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध लेखिका स्नेहलता वर्मा या मयूर यांच्या आई. आईच्या प्रेरणेने मयूर यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली आणि पाचव्या वर्षी टीव्हीवर पदार्पण केले. १९७८ मधील गाजलेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ‘लावारिस’ आणि ‘बेमिसाल’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली. तसेच ‘रेड रोज’ चित्रपटात राजेश खन्ना यांच्या बालपणीची भूमिका साकारून त्यांनी अनेक पुरस्कारही मिळवले.

मुख्य अभिनेता म्हणून संघर्ष

१९८३ मध्ये ‘लव्ह इन गोवा’ या चित्रपटातून मयूर यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्यानंतर त्यांनी दिलीप कुमार आणि जितेंद्र यांसारख्या महानायक कलाकारांबरोबर काम केले. मात्र, बालकलाकार आणि मुख्य अभिनेता यांच्यातील वयाच्या टप्प्यावर त्यांना योग्य भूमिका मिळत नव्हत्या.

अमिताभ बच्चन यांचा तो मोलाचा सल्ला

मुलगा अभिनयापासून दूर राहून चुकीच्या मार्गाला जाऊ नये, अशी काळजी त्यांच्या आईला वाटत होती. अशा वेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना मोलाचा मार्ग दाखवला. मयूर सांगतात, “आमच्या दोन्ही कुटुंबांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. माझी आई जेव्हा अमिताभजींकडे सल्ला मागायला गेली, तेव्हा त्यांनी मला सेटवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा सल्ला दिला.”

mayur-raj-verma-young-amitabh-bachchan-mahabharat-uk-restaurant
बालकलाकार मयूर वर्मा, राशीद लकडावाला, अभिनेते अमिताभ बच्चन, निर्माते शांती चोप्रा, दिग्दर्शक एम. हनीफ आणि बशीर अहमद. (एक्सप्रेस आर्काइव्ह फोटो)

बिग बींच्या या सल्ल्यानुसार मयूर यांनी ‘नमक हलाल’ चित्रपटादरम्यान दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्याबरोबर काम सुरू केलं. कालपर्यंत पडद्यावरचा स्टार असलेला अभिनेता आज दुसऱ्या कलाकाराच्या मेकअप रूमबाहेर उभा राहत होता. हा बदल खूप मोठा होता, पण मयूर यांनी या नव्या प्रवासाचाही मनापासून आनंद घेतला.

दिग्दर्शनातील संधीचं केलं सोनं

प्रकाश मेहरा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर मयूर वर्मा यांना स्वतःचा शो बनवण्याची इच्छा झाली. त्यांच्या याच जिद्दीमुळे त्यांना ‘लहरें’ या एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मसाठी भारतातील पहिले व्हिडिओ मॅगझिन ‘व्हरायटी’ दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. निर्माते सुरुवातीला काहीसे साशंक होते, पण मयूर यांनी थेट अमिताभ बच्चन यांना या शोच्या उद्घाटनासाठी आणण्याचे मोठे आश्वासन दिले. त्या काळात अमिताभ अशा व्हिडीओमध्ये काम करत नसत, तरीही मयूर आत्मविश्वासाने म्हणालेले, “त्यांनी अजून होकार दिलेला नाही, पण ते मला नकारही देणार नाहीत.”

दिग्दर्शक म्हणून पदार्पण आणि ‘व्हरायटी’ शो

अमिताभ यांना तयार करणं सोपं नव्हतं. अखेर मयूर यांनी थेट बिग बींच्या घरी जाऊन त्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलं, “तुम्ही या शोमध्ये आला नाहीत, तर मी कधीच दिग्दर्शन करणार नाही.” अखेर बिग बींनी प्रेमापोटी त्यांना होकार दिला. तेव्हा अमिताभ ‘खुदा गवाह’चे शूटिंग करत होते आणि चित्रपटातील त्यांचा लुक सिक्रेट ठेवायचा होता. पण निर्माते मनोज देसाई यांच्या मदतीने मेहबूब स्टुडिओमध्ये तोच लुक शूट करण्यात आला. ‘व्हरायटी’ शो तुफान गाजला आणि मयूर यांचे दिग्दर्शक म्हणून यशस्वी पदार्पण झाले.

Mayur Verma quit Bollywood to follow wife dream
अभिनेते मयूर राज वर्मा (फोटो- इंडियन एक्सप्रेस आर्काइव्ह)

टीव्ही एशिया’, ब्रिटनचा प्रवास आणि ‘महाभारत’

याच दरम्यान अमिताभ आणि अजिताभ बच्चन यांनी ब्रिटनमध्ये ‘टीव्ही एशिया’ हे चॅनल सुरू केले आणि त्यांनी मयूर यांना यूकेला पाठवले. तिथे ‘द ब्रेकफास्ट शो’चे सूत्रसंचालन करत राज यांनी इमरानन खान, देव आनंद, बप्पी लहरी, राहुल रॉय आणि हरिहरन यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. यामुळे ब्रिटनमधील आशियाई प्रेक्षकांमध्ये ते लोकप्रिय झाले.

‘महाभारत’मधील अभिमन्यूची भूमिका

याच काळात बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत मयूर यांना ‘अभिमन्यू’ची ऐतिहासिक भूमिका मिळाली. गुफी पेंटल यांच्यामुळे मिळालेल्या या भूमिकेने त्यांना घरोघरी पोहोचवले. त्यानंतर त्यांनी झी टीव्ही, B4U आणि सोनी टीव्हीसाठीही काम केले. १९९१ मध्ये त्यांनी ब्रिटनमध्ये स्वतःचे पहिले घर विकत घेतले.

प्रसिद्धी सोडून शांत आयुष्य जगण्याचा मयूर यांचा निर्णय

सुमारे २००७ मध्ये मयूर यांनी आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. वर्षानुवर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर, त्यांनी प्रसिद्धीचे हे वलय सोडून शांत आणि साधे आयुष्य जगायचं ठरवलं. त्यानंतर ते आपली पत्नी नूरी आणि आई स्नेहलता यांच्याबरोबर ते वेल्स, यूके इथे स्थायिक झाले.

आपल्या या निर्णयाबद्दल ते म्हणालेले, “खूप वर्षांपूर्वी मी सुट्टीमध्ये वेल्सला आलो होतो, तेव्हाच मला इथे आपलं घर असावं असं वाटलं होतं. मला इथल्या लोकांबरोबर साधं आयुष्य जगायचं होतं. इतक्या सुंदर ठिकाणी राहण्यासाठी मला निवृत्तीपर्यंत वाट पाहायची नव्हती. मी पत्नी आणि आईशी यावर चर्चा केली आणि काहीही विचार न करता आम्ही इथे शिफ्ट झालो.”

ब्रिटनमध्ये यशस्वी रेस्टॉरंट व्यावसायिक आहेत मयूर वर्मा

चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर त्यांनी पत्नीचे प्रोफेशनल शेफ बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेल्समध्ये भारतीय रेस्टॉरंट सुरू केले. आज राज मयूर वर्मा हे ब्रिटनमध्ये अनेक यशस्वी रेस्टॉरंट्सचे मालक म्हणून आपले आयुष्य आनंदात जगत आहेत.