Salman Khan Old Video : बॉलीवूडचा ‘दबंग’ म्हणजेच अभिनेता सलमान खान हा त्याच्या सिनेमांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. तसेच त्याच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळेही तो अनेकांचं लक्ष वेधून घेतो. सलमान खानची इंडस्ट्रीत ‘भाईजान’ अशीही एक ओळख आहे. बॉलीवूडमधल्या कलाकारांसह सलमानचे मीडियाशीसुद्धा अनेक वर्षांपासून कधी मैत्रीचं तर कधी वादग्रस्त नातं राहिलं आहे. त्याने अनेकदा करिअरबद्दल मोकळेपणाने संवाद साधला आहे, पण खासगी आयुष्यातील थेट प्रश्नांमुळे त्याचे मीडियाबरोबर काहीवेळेस वादही झाले आहेत.

अशातच सलमानचा १९९३ मधील एक जुना व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पत्रकार सुषमा दत्त यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे सलमान काहीसा अस्वस्थ आणि चिडल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये पत्रकार सुषमा सलमानच्या तेव्हाच्या रिलीज होऊ घातलेल्या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणतात, “हा चित्रपट चालणार नाही.” त्यावर सलमान विचारतो, “का? का चालणार नाही?” त्यावर त्या उत्तर देतात, “कारण यात कथाच नाही.” मग सलमान म्हणतो, “मी असेच चित्रपट करतो, स्क्रिप्ट (संहिता) नसली तरी चालते.” त्यावर पत्रकार म्हणतात, “मग तो फ्लॉप होईल.”

“ही मुलाखत आहे?” सलमान रागात म्हणालेला…

यावर सलमानने चिडून स्टुडिओमधून बाहेर जाण्याचा इशारा देत म्हटले, “आपण आज बाहेर जाणार आहोत का? माझे मित्र बाहेर वाट पाहत आहेत. चला आता जाऊया.” त्यावर सुषमा म्हणाल्या, “तुम्ही जाऊ शकता, स्टुडिओत आल्याबद्दल धन्यवाद.” मग सलमानने त्यांना उत्तर दिलं, “ही मुलाखत आहे? तुम्ही भारतात या…” त्यानंतर पत्रकार सुषमा कॅमेरामनला मुलाखत थांबवण्याचा इशारा देतात. पण, सलमान “नाही… नाही… अजिबात थांबवू नका” असं म्हणत मुलाखत सुरूच ठेवायला सांगतो.

व्हिडीओमध्ये पुढे सलमान म्हणतो, “बस्स… झालं… तुम्ही लोक खूप पैसे कमावता. स्वतःचा स्टुडिओ आहे, निर्माता स्वत:चा आहे; सगळं काही घराचंच असल्यासारखं आहे.” त्यावर सुषमा म्हणाल्या, “हा मुलाखतीचा भाग नाही, ती १५ मिनिटांपूर्वीच संपली आहे.” मग सलमानही “हा मुलाखतीचाच एक भाग आहे,” असे म्हणतो व नंतर व्हिडीओ संपतो.

सलमान खानच्या व्हिडीओवर नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओखालील कमेंट्समध्ये काहींनी सलमानची बाजू घेतली आहे, तर काहीजण पत्रकार सुषमा यांच्या बाजूने बोलले आहेत. एकाने म्हटलंय की, “त्या पत्रकार सलमानला म्हणाल्या की, तुझा सिनेमा फ्लॉप होईल. असं ऐकल्यानंतर त्याच्याकडून काय पद्धतीचं वागणं अपेक्षित आहे?” तसंच आणखी एकाने “मुलाखत घेणाऱ्यांनी अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नव्हते. चित्रपट फ्लॉप होईल असे सांगणे हे त्यांचे काम नाही”, अशी कमेंट केली आहे. तसंच काहींनी “त्या पत्रकाराची संवाद साधण्याची शैलीच तशी आहे” असं म्हटलं आहे.

सलमान खानचा जुना व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच एका बहुप्रतीक्षित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया यांनी केले आहे. या चित्रपटात सलमानबरोबर अभिनेत्री चित्रांगदा सिंगही मुख्य भूमिकेत आहे.