Shahrukh Khan Co actor Net Worth: काही कलाकारांचे मोजके सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजतात; मात्र ते पुढे फारसे चित्रपटांत दिसत नाहीत. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. या अभिनेत्याने त्याच्या कारकि‍र्दीत फक्त एक हिट सिनेमा दिला. मात्र, पुढे त्याला फारसे यश मिळू शकले नाही. असे असले तरी त्याची संपत्ती थक्क करणारी आहे. या अभिनेत्याने शाहरुख खान, सलमान खान,अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्सबरोबरही स्क्रीन शेअर केली आहे. आता हा अभिनेता कोण? त्याचा गाजलेला सिनेमा कोणता, याबद्दल जाणून घेऊयात.

‘या’ अभिनेत्याचा फक्त एकच सिनेमा झाला हिट

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून झायेद खान आहे. झायेद अभिनेता व चित्रपट निर्माते संजय खान व दिवंगत अभिनेत्री झरीन खान यांचा मुलगा आहे. आज त्याचा ४६ वा वाढदिवस आहे. झायेद हा फिरोज खान यांचा पुतण्या आहे; तर फरदीन खानचा चुलतभाऊ आहे.

अभिनेत्याने २३ व्या वर्षी जवळजवळ २३ वर्षांपूर्वी त्याच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती. चुरा लिया हैं तुमने हा त्याचा पहिला सिनेमा होता. या सिनेमातून त्याला फारशी ओळख मिळाली नाही. मात्र, २००५ ला प्रदर्शित झालेल्या मैं हूँ ना या सिनेमातून अभिनेता लोकप्रिय झाला. या सिनेमातून त्याला वेगळी ओळख मिळाली. या सिनेमात त्याने शाहरुख खानबरोबर काम केले होते. हा त्याच्या करिअरमधील एकमेव हिट सिनेमा होता.

अक्षय कुमार आणि संजय दत्त यांच्याबरोबर त्याने ‘ब्ल्यू’ चित्रपटात काम केले. तो २००८ ला प्रदर्शित झालेल्या ‘युवराज’ या चित्रपटात सलमान खानबरोबरही दिसला होता. हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. झायेद अनेक चित्रपटांमध्ये दिसला; पण त्यातील काही चित्रपट सरासरी होते आणि काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

झायेद खानने २००६ मध्ये मलायका पारेख यांच्याशी लग्न केले. मलायका आणि झायेद यांना आरिफ व झिदान खान अशी दोन मुले आहेत. अभिनेत्याच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, ‘ईटी नाऊ’नुसार त्याची संपत्ती अंदाजे १५०० कोटी रुपये (अंदाजे १.५ अब्ज डॉलर्स) इतकी आहे. २०२४ मध्ये त्याने यूट्यूबवर सुभोजित घोष यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जेव्हा त्याला त्याच्या संपत्तीबद्दल विचारले गेले, तेव्हा तो हसला. त्याने त्याची संपत्ती तितकी आहे, याला दुजोराही दिला नाही, तसेच ते नाकारलेही नाही. त्याने २०११ मध्ये ‘फ्री एंटरटेन्मेंट’ नावाची निर्मिती कंपनी सुरू केली. त्याने विविध कंपन्यांमधील गुंतवणुकीतून त्याची मोठ्या प्रमाणात कमाई केली होती.