Zayed Khan on Hrithik Roshan-Sussanne Khan Divorce: हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाची सिनेसृष्टीत प्रचंड चर्चा झाली होती. दोघे १४ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. पण घटस्फोटानंतर गेल्या काही वर्षांत हृतिक व सुझान चांगले मित्र झाले आहेत. दोघे मुलांसाठी कायम एकत्र येतात. आता सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खानने त्यांच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. खूप प्रयत्न करूनही काही गोष्टी टिकत नाहीत, असं वक्तव्य त्याने या दोघांच्या घटस्फोटाबद्दल केलं.
झूमशी बोलताना झायेद म्हणाला, “एकत्र राहणं त्यांच्या नशिबातच लिहिलं नसावं. खरं तर एखादी गोष्ट टिकणार नसते, तेव्हा ती ओढून-ताणून धरण्याचा प्रयत्न करणं फार वाईट असतं, कारण त्यात दोन्ही व्यक्तींना त्रास होतो. आणि हे सगळं कशासाठी? शेवटी तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा असतो, त्यांच्या आयुष्याचा तुम्ही भाग असता, तुम्हाला त्यांना लहानाचं मोठं होताना पाहायचं असतं. हृतिक व सुझानच्याही नात्यात असंच झालं आणि त्यांच्या नात्याचा मुख्य उद्देश मुलांवर लक्ष केंद्रित करणं हा बनला.”
खूप जणांना विचित्र वाटतं पण…
दोघांच्या निर्णयात कुटुंबाचा समंजसपणा महत्त्वाचा ठरला, असं झायेदला वाटतं. “जे झालं ते झालं, आता ते सगळं संपलंय. आता तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. तुम्ही स्वतःचा आनंद शोधा, असा विचार आमच्या कुटुंबाने केला. आम्ही समाजाच्या दबावाखाली जगणारे कुटुंब नाही. आम्ही काही गोष्टींबाबत खूप जागरूक आणि सुशिक्षित आहोत. बऱ्याच जणांना असं वागणं विचित्र वाटतं, मला माहित आहे. बरेच लोक याबद्दल नाराजी व्यक्त करतात. पण ठिके, आम्हाला त्याची काहीच अडचण नाही,” असं झायेदने नमूद केलं.
सुझान खान व हृतिक रोशन एकमेकांचा आदर करतात
हृतिक रोशन आणि सुझान खान या दोघांनाही नवीन जोडीदार मिळाले आहेत, तरीही ते एकमेकांचा प्रचंड आदर करतात, असं झायेदने नमूद केलं. “प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे, पण मला वाटतं की त्या दोघांना एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि काळजी ही प्रेमापेक्षाही जास्त अर्थपूर्ण आहे. दोघांनाही खूप चांगले जोडीदार मिळाले आहेत. सबा (हृतिकची गर्लफ्रेंड) खूप चांगली आहे. तर सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान माझ्या धाकट्या भावासारखाच आहे,” असं झायेद खान म्हणाला.
सुझान खान व अर्सलान गोनीच्या नात्याबद्दल झायेद खान म्हणाला…
लोक सतत ट्रोल करायचे, पण तरीही सुझान खान पुन्हा एकदा प्रेमात पडली आणि ते नातं स्वीकारलं, याचा भाऊ म्हणून झायेदला अभिमान वाटतो. तो म्हणाला, “त्यांना ज्या परिस्थितीतून जावे लागले, ते मी शब्दांत मांडू शकत नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली, आयुष्यात प्रगती केली आणि पुन्हा एकदा प्रेमात पडले, त्याबद्दल मला त्यांचा आदर वाटतो. कारण ही गोष्टी सोपी नाही. शेवटी महत्त्वाचं काय आहे? तर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असावी जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. जर तुमच्याबरोबर एखादी खंबीर व्यक्ती नसेल, तर या जगात वावरणं खूप कठीण आहे.”
झायेद खानचे वडील संजय खान यांनीही हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली होती. आपली मुलगी सुझान आणि हृतिकच्या नात्याबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. “सुझानमुळे मला ऋहान आणि हृदानसारखी नातवंडं मिळाली. दोघेही अतिशय देखणे आणि चांगले संस्कार असलेली मुलं आहेत. हृतिक आणि सुझानचा घटस्फोट परस्पर सहमतीने झाला होता. त्यांच्यात कधीही कटुता नव्हती,” असं संजय खान म्हणाले होते.
दरम्यान, हृतिक रोशन व सुझान खान यांनी २००० साली लग्न केलं होतं. २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आता आयुष्यात ते आपापल्या जोडीदारांबरोबर आनंदी आहेत.
