Zayed Khan On Zarine Khan Funeral Controversy : ज्येष्ठ अभिनेत्री जरीन खान यांचे गेल्या वर्षी निधन झाले. निधनानंतर त्यांच्यावर हिंदू रीतीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, ‘मुस्लीम असूनही हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का केले,’ असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यावर आता जरीन खान यांचा मुलगा व अभिनेता झायेद खानने प्रतिक्रिया दिली आहे.
जरीन खान ८१ वर्षांच्या होत्या. जरीन खान यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जरीन यांच्या पश्चात त्यांचे पती संजय खान आणि सुझान खान, सिमोन अरोरा, फराह अली खान व झायेद खान ही मुलं आहेत.
झायेद खानने आई जरीन यांच्यावर हिंदू रीतीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेला उत्तर देत झायेदने स्पष्ट केले की, त्याच्या आईचीच ती शेवटची इच्छा होती.
‘झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीत झायेद भावूक झाला होता. आई पारसी असूनही तिनं मुस्लीम कुटुंबात लग्न केले होते; मात्र तिची इच्छा पूर्ण करणं हे मुलाचं कर्तव्य असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. म्हणूनच त्यानं हिंदू रीतीरिवाजांनुसार आई जरीन यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले.
झायेद म्हणाला की, त्यांच्या कुटुंबात ‘माणुसकी’ सर्वांत महत्त्वाची आहे. त्यांच्या घरी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक काम करतात आणि त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. धर्म हा आमच्यासाठी खूप वैयक्तिक विषय आहे आणि प्रत्येक जण त्याकडे आपापल्या पद्धतीने पाहतो. कोणता धर्म चांगला किंवा वाईट, यावर वाद घालण्यापेक्षा माणुसकी जपणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष कुटुंब मानतो, असंही त्यानं सांगितलं.
आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना झायेद म्हणाला की, एकदा त्या एका नदीकाठी बसल्या होत्या आणि त्यांनी सहज सांगितलं होतं, “माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थी या नदीत विसर्जित कराव्यात. मला मुक्त व्हायचं आहे.” आईची हीच इच्छा आम्ही पूर्ण केली. आता लोक काय म्हणतात यानं आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण- शेवटी आईची इच्छा पूर्ण करणं हेच त्याच्यासाठी सर्वांत मोठं कर्तव्य आहे. लोक कितीही नकारात्मक बोलले तरी मी त्यांना दोष देत नाही. लोकांचा दृष्टिकोन बदलायला वेळ लागेल, असंही तो म्हणाला.
दरम्यान, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळानं जरीन खान यांचं निधन झालं होतं. त्यांनी देव आनंद यांच्याबरोबर ‘तेरे घर के सामने’ (१९६३) या हिंदी चित्रपटात काम केलं होतं. १९६० च्या दशकात त्यांची ओळख अभिनेता संजय खान यांच्याशी झाली आणि १९६६ मध्ये त्यांनी लग्न केलं.
