Zeenat Aman on Bollywood Affair: बॉलीवूडचा एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री झीनत अमान या चित्रपटांबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना झीनत यांनी १९८५ मध्ये अभिनेता मजहर खानशी लग्न केलं होतं. मात्र या लग्नात झीनत यांना अनेक अडचणी व आव्हानं आली होती. लग्नानंतर पहिल्याच वर्षात मजहर फसवणूक करत असल्याचं कळल्यानंतरही त्यांनी घटस्फोट न घेता १२ वर्षे संसार केला. आता झीनत अमान यांनी बॉलीवूडमधील अफेअर आणि नात्यांबद्दल मत व्यक्त केलं आहे.

‘बिटवीन अस बाय अनामिका’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत झीनत अमान यांनी वैयक्तिक आयुष्य व त्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत मत वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, “मी खूप तरुण होते, त्यावेळेस काही निर्णय घेतले. त्या वयामध्ये मला जे योग्य वाटत होतं आणि जे मला हवं होतं, त्यानुसार निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय योग्य ठरले, तर काही चुकीचे ठरले. वय हे तुम्हाला आयुष्याकडं पुन्हा मागं वळून बघण्याची संधी देतं. नेहमीच स्वतःला दोष देण्याची गरज नसते.”

विवाहबाह्य संबंध ही फक्त बॉलीवूडची समस्या नाही – झीनत अमान

बॉलीवूडमध्ये अनेकदा अफेअर आणि प्रेमसंबंध असल्याचं दिसून येतं. सिनेविश्वातील विवाहबाह्य संबंधांबद्दल अनेकदा चर्चा रंगतात. याबाबत झीनत अमान म्हणाल्या, “विवाहबाह्य संबंध ही फक्त बॉलीवूडची समस्या नाही; तर ही माणसाची कमजोरी आहे. आपल्या इंडस्ट्रीत एवढाच फरक आहे की, खासगी, वैयक्तिक नातं अनेकदा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय बनतं. दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखाला गॉसिपमध्ये बदलून काहीही फायदा होत नाही.”

झीनत अमान यांनी त्यांच्या लग्नाबद्दलही मोकळेपणाने सांगितलं. अभिनेता मजहर खान यांच्याशी लग्न करताना त्यांना आई होण्याची इच्छा होती, अशी कबुली त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, “जेव्हा मी मजहरशी लग्न केलं, तेव्हा मला आई होण्याची इच्छा होती. कारण त्यावेळी मला वाटत होतं की, आपलं कुटुंब असावं आणि त्यासाठी मुलं असणं गरजेचं आहे. त्यानुसार मी निर्णय घेतला. पण या नात्याने मला प्रेम आणि स्वतःला गमावणं यातील फरक शिकवला.”

पुढे त्या म्हणाल्या, “या नात्यातून शेवटी मला समजलं की, स्वतःला उद्ध्वस्त करून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. मी त्याच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी स्वतःलाच स्वतःची मदत करावी लागेल, हे मला जाणवलं. तो माझ्या मुलांचा वडील आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच अपमानास्पद किंवा वाईट बोलायचं नाही.”

झीनत पुढे म्हणाल्या, “यश हे नक्कीच तुम्हाला एक आत्मविश्वास देतं, पण तुमचं मन तुटलं, तर ते तुम्हाला तुमच्या मर्यादा दाखवून देतं. नात्यामध्ये फक्त प्रेमच नाही, तर आदर असणंही महत्त्वाचं आहे. कधी कधी स्वतःसाठी आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी नात्यातून बाहेर पडणं हेदेखील स्वतःवर केलेलं प्रेम असतं.”

आपण स्वतःलाच ओळखणं विसरून जातो – झीनत

झीनत अमान यांनी लग्नातील कटू अनुभवांबद्दलही सांगितलं. त्या म्हणाल्या, “वैवाहिक नात्यामध्ये महिलांनाच परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा चांगला अर्थ लावायचा आणि स्वतःला होणारा त्रास मात्र किरकोळ समजायचा, असं त्यांना शिकवलं जातं. पण मला हे आधी समजायला हवं होतं की, मनात निर्माण होणारी अस्वस्थता हीदेखील एक महत्त्वाची खूण असते. आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकानं याचा अनुभव घेतलेला असतो. पण कधीकधी समोरच्याशी जुळवून घेताना आपण स्वतःलाच ओळखणं विसरून जातो.”