Zeenat Aman On Raj Kapoor: राज कपूर आणि झीनत अमान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. मात्र, सुरुवातीला राज कपूर या चित्रपटात झीनत अमान यांना रुपाची भूमिका देण्यास तयार नव्हते. मात्र, झीनत अमान यांना ती भूमिका करायची होती. राज कपूर यांनी ती भूमिका त्यांना द्यावी यासाठी झीनत अमान यांनी काय केले होते, याचा खुलासा अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केला होता.
“त्यांनी मला…”
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये झीनत अमान यांनी लिहिलेले, “१९७६ साली मी राज कपूर आणि शशी कपूर यांच्याबरोबर ‘वकील बाबू’ या चित्रपटात काम करत होते. त्या दिवसांत राज कपूर ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाच्या कल्पनेबद्दल चर्चा करत असत. त्या दिवसांत त्यांनी आम्हाला या चित्रपटाच्या कथेबद्दल असे सांगितले होते की, एक पुरुष एका स्त्रीच्या आवाजाच्या प्रेमात पडतो, पण तिच्या दिसण्याशी त्याला जुळवून घेता येत नाही. ते चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते, मात्र त्यांना मला रुपाच्या भूमिकेत कास्ट करायचे नव्हते. मी त्यावेळी मोठी स्टार होते, मात्र त्यांनी मला कास्ट करण्यात रस दाखवला नाही, त्याचा मला त्रास होऊ लागला. माझी मॉडर्न प्रतिमा, मिनी स्कर्ट आणि बूट यामुळे मी त्यांना रुपाच्या पात्रात दिसत नव्हते.”
पुढे त्यांनी लिहिलेले, “त्यानंतर मी एका संध्याकाळी लवकर शूटिंग संपवले आणि माझ्या ड्रेसिंग रुममध्ये जास्तीचे ३० मिनिट घालवले. मला जशी रुपा वाटत होती, तशी मी तयार झाले. मी घागरा चोळी घातली आणि रिबीनीने माझ्या केसांच्या वेण्या घातल्या. त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर डिंकाने टिश्यू पेपर चिटकवून डाग लावला. मला माहीत होते की, राजजी त्यांचा बहुतेक वेळ हा द कॉटेज या ठिकाणी घालवत असत. तिथे ते त्यांच्या मीटिंग, छोटे कार्यक्रम आयोजित करत असत. मी तयार होऊन कॉटेजवर पोहोचले. जॉनने राजजींना माझा निरोप दिला. लवकरच राजजी मला भेटण्यासाठी आले. मला त्या अवतारात बघून, गावाकडील मुलीच्या रुपात बघून त्यांना खूप आनंद झाला होता. जेव्हा त्यांचे हसणे थांबले, तेव्हा एक फोन करण्याच्या निमित्ताने ते बाजूला गेले. २० मिनिटानंतर त्यांची पत्नी कृष्णाजी दारात उभ्या होत्या. मूठभर सोन्याच्या गिनी त्यांच्या पर्समध्ये होत्या. राजजींनी चित्रपटाच्या स्वाक्षरीची किंमत म्हणून त्या माझ्याकडे मोठ्या आस्थेने दिल्या आणि अशा प्रकारे मला रुपाची भूमिका मिळाली. त्या सोन्याच्या गिनी मी अनेक वर्षे माझ्याजवळ जपून ठेवल्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्या चोरीला गेल्या. पण, तरीही जर मला सोने आणि आठवणी यामधील एक काहीतरी निवडायला सांगितले तर आठवणी निवडेन.”
राज कपूर आणि झीनत अमान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाचा चित्रपट मानला जातो. झीनत अमान यांनी साकारलेल्या रुपा या पात्राची मोठी चर्चा झाली होती.
