झीनत अमान बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. आपल्या कारकिर्दीत झीनत यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ७० च्या दशकातील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘डॉन’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ ‘यादों की बारात’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. वयाच्या ७१ व्या वर्षीही त्यांची फिटनेस आणि स्टाईल अनेकांना आश्चर्यचकित करते. नुकतच त्यांनी स्वत:बाबत मोठा खुलासा केला आहे.

झीनत अमान यांनी त्यांचा मुलगा आणि सूनेबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी झीनत यांनी निळ्या रंगाचा शरारा ड्रेस घातला होता. दिल्लीतील एका कार्यक्रमातला हा फोटो शेअर करत झीनत यांनी लिहिले. “मी माझ्या मुलांच्या वडिलांसोबत गुपचूप लग्न केले होते. आम्ही घरातून पळून आलो आणि सिंगापूरमध्ये दोन साक्षीदारांसमोर लग्न केले. पण मी भारतीय पद्धतीच्या कार्यक्रमांच्या आकर्षणापासून लांब राहिले असे मी म्हणू शकत नाही. भारतीय अन्न, संगीत, रंग, आनंदी वातावरण हे तुम्हाला आकर्षित करतातच. हे फोटो गेल्या आठवड्यातील आहे आम्ही दिल्लीत एका सुंदर कार्यक्रमाला गेलो होतो. या निमित्ताने मला एक गुपित सांगायचे आहे.”

हेही वाचा- 69th National Film Awards: दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना वहिदा रेहमान झाल्या भावुक; म्हणाल्या, “हा पुरस्कार…”

झीनत म्हणाल्या “वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी मी जे फॅन्सी डिझायनर कपडे घालते ते उधार घेतलेले असतात. मी घातलेले दागिने विमलकडून उधारीवर घेतले आहेत. निळ्या रंगाचा शरारा माझी प्रिय मैत्रिणी मोहिनी छाब्रिया हिने पाठवला आहे. जो मी ड्राय क्लीन करून परत करीन.”

झीनत पुढे म्हणाल्या “मी हे यासाठी सांगत आहे जेणेकरून तरुणांना नवीन कपडे खरेदीचे दडपण जाणवू नये आणि डिझायनर कपड्यांमागे सेलिब्रिटींचे पैसे खर्च होऊ नयेत. तुम्ही कर्ज घ्या, खर्च करा किंवा खरेदी करा, पण तुम्ही तुमचा बँक बॅलन्समधून पैसे खर्च करत नाही हे महत्त्वाचे आहे. आपण जे कपडे परिधान करतो त्याचा आनंद घेतो. माझ्या आयुष्यात आराम ही खूप महत्वाची गोष्ट आहे.”