Zeenat Aman shares post: झीनत अमान या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. जुने फोटो शेअर करतात. त्यांनी काम केलेल्या अनेक चित्रपटातील किस्से सांगतात. त्यांचे अनुभवही सांगतात. त्यांच्या पोस्टमधून एखाद्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करताना काय घडले असेल, याची कल्पना येते.
आता झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पुन्हा एकदा पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. गेल्या आठवड्यातील फोटो असल्याचे त्यांनी लिहिले. तसेच, या वयात काम मिळत असल्याने कृतज्ञतादेखील व्यक्त केली. त्यांनी असेही लिहिले की येणाऱ्या काळात मला काम मिळेल, अशी आशा आहे.
“जर मला काम मिळणे बंद झाले तर…”
पुढे त्यांनी असेही लिहिले, “कुठल्यातरी शहरात जाणे, कुठल्यातरी स्क्रीप्टवर वाचणे, कुठल्यातरी जाहिरातीचे शुटिंग करणे, व्यायाम करणे अशी छोटी-छोटी ध्येये साध्य करणे मला आवडते. त्यामुळे प्रत्येक आठवड्याचे ध्येय काय आहे, हे ठरलेले असते. खरे सांगायचे, तर जे पैसे मिळतात, त्यातून मानसिक शांतता मिळते.”
झीनत अमान असेही म्हणाल्या, “मी कधी कधी विचार करते की जर मला काम मिळणे बंद झाले तर मी माझा वेळ कसा घालवेन? मला असे वाटते की कदाचित मी बेडवर पडून राहीन.तसेच मोबाईलवर लहान मुलांचे आणि प्राण्यांचे व्हिडीओ पाहत राहीन. मी इतक्या लहान वयात काम सुरू केले होते. त्यामुळे मला कोणते छंद जोपासता आले नाहीत. माझे वय ७० हून अधिक आहे. आता काही गोष्टी शिकाव्यात असे मला वाटत नाही. त्यामुळे आता मी पियानो वाजवायला शिकावे किंवा काही पदार्थ शिकावेत असे मला वाटत नाही.”
ज्येष्ठ अभिनेत्री असेही म्हणाल्या, “हे सगळं सांगितल्यानंतर मला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की तुमच्या ओळखीत असे कोणी आहे का, ज्याने आयुष्याच्या उशिरा टप्प्यात एखादा छंद सुरू केला आणि तो छंद मनापासून जोपासला? तुम्हाला अशी एखादी गोष्ट माहित असेल तर त्यांची गोष्ट कमेंटमध्ये शेअर करा. ही गोष्ट आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
झीनत अमान यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी त्यांचे अनुभवदेखील सांगितले आहेत.
झीनत अमान यांचे ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘यादों की बारात’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘कुर्बानी’, ‘दोस्ताना’ आणि ‘धर्म वीर’, असे अनेक चित्रपट गाजले. लवकरच त्या बन टिक्की या चित्रपटात दिसणार आहेत.
