Zeenat Aman shares post: झीनत अमान बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘हलचल’, ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘यादों की बारात’, ‘राम बलराम’, ‘यादों की कसम’, ‘बंधन कच्चे धागों का’, ‘पाखंडी’, ‘मेरी अदालत’, ‘दोस्ताना’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, विनोद खन्ना, राजेश खन्ना, जितेंद्र, देव आनंद अशा अनेक अभिनेत्यांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. सध्या झीनत अमान कोणत्याही चित्रपटात दिसत नसल्या तरीही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येतात.

झीनत अमान सोशल मीडियावर त्यांच्या चित्रपटांच्या आठवणी सांगतात. सहकलाकारांच्या आठवणी, शूटिंग करताना झालेल्या गमतीजमती, किस्से त्या शेअर करतात; त्यामुळे चाहत्यांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टी माहीत होतात.

Award Banner

आता झीनत अमान यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. झीनत यांनी इन्स्टाग्रामवर १९७० च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘तीसरी आँख’ चित्रपटातील एक खास सीन शेअर केला आहे. या सीनमध्ये पाहायला मिळते की, झीनत यांनी साकारलेले पात्र बरखा हे खोडकरपणे धर्मेंद्र यांच्या पात्राचा अशोकचा पाठलाग करत आहे.

“जुन्या चित्रपटांमधील सीन…”

हा सीन शेअर करताना झीनत अमान यांनी लिहिले, “जुन्या चित्रपटांमधील सीन पुन्हा पाहणे हा नेहमीच एक वेगळा आणि मजेशीर अनुभव असतो. कोणता सीन तुमच्या हृदयाला स्पर्श करेल किंवा तुम्हाला विचार करायला लावेल हे कळत नाही.”

पुढे त्यांनी लिहिले, “काही आठवड्यांपूर्वी ‘दोस्ताना’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचे पात्र इन्स्पेक्टर विजय मला चिडवत असल्याचा एक सीन मी शेअर केला होता. आता ‘तीसरी आँख’मधील एका सीनमध्ये मी धरमजींना चिडवत असल्याचे दिसत आहे.”

पुढे त्यांनी लिहिले, “हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकांच्या भूमिका फक्त दोन वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात बदलल्या का हे सांगता येणार नाही. पण, हा सीन लोकांच्या धारणांपेक्षा वेगळा आहे. तीसरी आँख चित्रपटातील सीनमध्ये अशोक हा भोळा असल्याचे दिसते. तर बरखा ही खोडकर आणि स्पष्टवक्ती आहे. अशोकचा ती पाठलाग करते, तर अशोक नाराज आणि चिडलेला दिसतो.”

“मजेशीरपणा आणि खोडकरपणा हे प्रेम…”

झीनत यांनी बरखा या पात्राविषयी पुढे लिहिले, “हे पात्र पारंपरिक भूमिकेपासून दूर जाणारे आहे. खरेतर, जसे मी इन्स्पेक्टर विजयच्या दृष्टिकोनाचे समर्थन करू शकत नाही, तसेच मी बरखाच्या दृष्टिकोनाचे समर्थन करू शकत नाही. मजेशीरपणा आणि खोडकरपणा हे प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम मार्ग आहेत. परंतु, मला वाटतं की आपले चित्रपट अनेकदा या भावना एक वेगळ्या टोकाला नेतात. आपल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये खरे, निरोगी प्रेम दाखवण्याऐवजी वेडेपणाचे उदात्तीकरण केले जाते. बॉलीवूडने पसरवलेल्या प्रेमाच्या या विचित्र कल्पनेला प्रोत्साहन देण्यात माझीही काही प्रमाणात भूमिका असल्याचे मला वाटते. पण, इथे मला हे स्पष्ट करायचे आहे की, रिलेशनशिपमध्ये संमती आणि आदर आवश्यक आहे.”

झीनत अमान यांनी पुढे प्रेक्षकांना उद्देशून लिहिले की, या सीनबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. मला हे सीन पुन्हा एकदा पाहायला मिळाले, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. या सीनमध्ये माझे सर्वात आवडते सहकलाकार धर्मेंद्रजी आहेत. ज्यांच्याबरोबर माझ्या केवळ गोड आठवणी आहेत.”