ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. वांगचुक दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. अशातच झीनत अमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारला त्यांच्याशी चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे.
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आल्यानंतर झीनत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्याविषयी काळजी व्यक्त केली. “आज माझं सगळं लक्ष देशाच्या राजधानीकडे आहे. कारण तिथे सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. मी वाचलं की सोनम यांचं वजन खूप कमी झालंय आणि त्यांना खूप त्रास होतोय,” असं झीनत अमान यांनी लिहिलं.
वांगचुक यांच्या कार्याचा केला उल्लेख
उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्यांना वांगचुक यांनी म्हटलं की, “मला उपोषण मागे घेण्यास सांगू नका, सरकारला विचारा की ते साधी चर्चा करायलाही का तयार नाहीत?” याचा उल्लेखही झीनत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला. पुढे झीनत अमान यांनी लिहिलं, “वांगचुक यांनी ‘सेकमॉल’ची (SECMOL) स्थापना केली, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ‘आइस स्तूप’चा शोध लावला, शिक्षण क्षेत्रात सुधारणा केल्या, ते एक पर्यावरण कार्यकर्ते आहेत आणि ‘३ इडियट्स’ चित्रपटातील आमिर खानची लोकप्रिय भूमिका ‘फुंसुक वांगडू’ ही त्यांच्याच खऱ्या आयुष्यावर प्रेरित आहे, अशी आठवण झीनत यांनी करून दिली.
केंद्र सरकारला आवाहन करत झीनत म्हणाल्या, “सोनम वांगचुक यांच्या इच्छेचा आदर करत, मी भारत सरकारला विनंती करते की त्यांनी भारताच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या मुद्द्यावर लवकरात लवकर चर्चा सुरू करावी. आपण असा समाज बनायला नको, जो अशा परिस्थितीत शांत बसून आपल्या देशातील एका महान विचारवंताचा बळी जाताना पाहील. भारताला शांततापूर्ण आंदोलनाचा मोठा इतिहास आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी अशा आंदोलनांना शांततेत चर्चा करून प्रतिसाद देणं हे त्यांचं कर्तव्य आहे.”
ओमी वैद्यने दिला दिला पाठिंबा
‘३ इडियट्स’ चित्रपटात ‘चतुर रामलिंगम’ची भूमिका साकारणारा अभिनेता ओमी वैद्यने सोनम वांगचुक यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सोशल मीडियावर त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. आमिर खानने या सिनेमात साकारलेली ‘फुंसुक वांगडू’ ही भूमिका सोनम यांच्यापासून प्रेरित होती. सध्या सोनम यांची प्रकृती खालावत आहे. “मला फुंसुक वांगडूला मरू देऊ नका,” असं ओमी वैद्यने म्हटलंय.
सोनम वांगचुक आंदोलन का करत आहेत?
‘NEET-UG’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि या परीक्षा घोटाळ्यानंतर कथितरित्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
या मागण्यांबरोबरच, सोनम वांगचुक यांनी लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा आणि या केंद्रशासित प्रदेशाचा संविधानाच्या ‘सहाव्या अनुसूची’मध्ये समावेश व्हावा, या आपल्या जुन्या मागण्यांचाही पुनरुच्चार केला आहे. दरम्यान, ताज्या मेडिकल बुलेटीननुसार, उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे वजन ८.२ किलो घटले आहे.
