Zindagi Na Milegi Dobara 2 Zoya Akhtar : मैत्री आणि प्रवासावर आधारित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे. २०११ साली प्रदर्शित झालेल्या या आयकॉनिक चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अखेर अपडेट समोर आली आहे. एक दशकाहून अधिक काळापासून प्रेक्षक या सिनेमाच्या पुढील भागाची वाट पाहत आहेत. आता दिग्दर्शिका झोया अख्तरने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

झोया अख्तरने सध्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सिक्वेलवर काम सुरू असल्याचा खुलासा केला आहे. ‘मॉन्सून फिल्म फेस्टिव्हल’दरम्यान ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिने सिनेमाबाबत माहिती दिली आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’ सिनेमा तयार केला जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत आतुरता निर्माण झाली आहे.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सिक्वेलबाबत काय म्हणाली झोया अख्तर?

झोया अख्तर म्हणाली, “सध्या आम्ही यावर काम करत आहोत. पुढे काय होईल किंवा काय नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही; पण त्या सर्व भूमिकांचा विचार करून नव्या काळात त्यांची पुन्हा एकदा भेट होणं योग्य वाटत असेल तर ते नक्की चांगलं होईल. जेव्हा हे प्रत्यक्षात येईल, तेव्हा मी त्याची घोषणा करेन.”

झोया अख्तरच्या या वक्तव्यामुळे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’च्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याआधीही अनेकदा झोयाला या व्यक्तिरेखा पुन्हा पडद्यावर आणण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. पण, यावेळी तिने टीम या कल्पनेवर सक्रियपणे काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी २०२५ मध्ये ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’च्या चर्चांना उधाण आलं होतं. हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर हे तिघेही ‘यस आयलंड’च्या एका जाहिरातीत एकत्र दिसल्याने सिनेमाबद्दल अंदाज बांधले जात होते. ही जाहिरात नाही तर सिनेमाचा टीझर असल्याचं चाहत्यांना वाटलं होतं.

चाहत्यांनी का केली होती झोयाला शिवीगाळ?

चाहत्यांची सिनेमाबाबत निराशा झाल्यानंतर सोशल मीडियावर राग व्यक्त केला होता. याचा एक मजेशीर किस्सा झोयाने सांगितला. ती म्हणाली, “लोकांना वाटलं की हा चित्रपटाचा ट्रेलर आहे. सुरुवातीला त्यांनी कौतुक केलं, पण नंतर मला मेसेज करून वाईट बोलू लागले आणि शिवीगाळ करू लागले. प्रेक्षक म्हणालेले, ‘हे अजिबात चांगलं नाही.’”

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’बद्दल सांगायचं, तर २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केलं होतं. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी ‘एक्सेल एंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली होती. हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा मित्रांच्या आयुष्यावर होती. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता.