Zoya Akhtar on Katrina Kaif kiss with Hrithik Roshan in ZNMD: झोया अख्तरचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा २०११मध्ये आलेला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या रोड कॉमेडी-ड्रामा चित्रपटात हिरोचा ड्रामा, ॲक्शन सीन्स किंवा हृतिक रोशन आणि कतरिना कैफच्या लव्ह स्टोरीवर उगाचच फोकस, असं काहीही नव्हतं. झोया आणि तिची सह-लेखिका रीमा कागतीने ही कथा अत्यंत नैसर्गिक पद्धतीने पडद्यावर मांडली, जी प्रेक्षकांना फार आवडली. या चित्रपटात कतरिना कैफ व हृतिकचा एक किसिंग सीन आहे. या सीनबद्दल झोयाने मोठा खुलासा केला आहे.
हृतिक आणि कतरिना हे दोघेही उत्कृष्ट डान्सर आहेत. पण ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये त्यांचा डान्स किंवा रोमान्स दाखवणारं एकही गाणं नव्हतं. मात्र, हा निर्णय झोयासाठी अजिबात सोपा नव्हता, कारण तिच्यावर कलाकारांच्या टीमकडून रोमँटिक गाणं घेण्यासाठी मोठा दबाव होता. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’शी बोलताना झोया म्हणाली, “मॅनेजमेंटसह प्रत्येकजणाचं म्हणणं होतं की, ‘कतरिना आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र येत आहेत, तर त्यांचा डान्स असायलाच पाहिजे.’ त्यावर मी म्हणाले, ‘मला समजत नाहीये की ते गाणं मी कथेत कुठे आणि कसं टाकू?’ मग त्यांनी विचारलं, ‘बीचवर टाकू शकतेस?’ मग मी म्हणाले, ‘नाही! मला बीचवर गाण्याची कल्पना करवत नाहीये.’ नंतर त्यांनी विचारलं, ‘कतरिना ‘सेनोरिटा’ गाण्यात येऊ शकते का?’ मी पुन्हा नकार दिला, कारण ती निघून गेल्यानंतर पुन्हा परत आणणं योग्य नाही.”
गाणं न ठेवण्याचा निर्णय झोया अख्तरने का घेतला?
दोघांचं गाणं टाकल्याने चित्रपट आणखी गाजला असता, हे मान्य करत झोया म्हणाली, “अर्थातच, त्याचा चित्रपटाला आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी फायदा झाला असता. कारण ते दोघेही एकत्र अप्रतिम दिसतात, त्यांची केमिस्ट्री छान आहे आणि दोघेही उत्कृष्ट डान्सर आहेत. पण माझं मन मला म्हणत होतं की हे गाणं चित्रपटात जबरदस्तीने टाकल्यासारखं वाटेल.”
कतरिना व हृतिकच्या किसबद्दल झोया म्हणाली…
चित्रपटातील बारकाव्यांबद्दल बोलताना झोयाने कतरिना कैफच्या त्या सीनचा उल्लेख केला, जिथे ती हृतिक रोशनला किस करण्यासाठी बाईक चालवत येते. हा कतरिनाचा पहिलाच ऑन-स्क्रीन किसिंग सीन होता. “जेव्हा मी कतरिनाला भेटले, तेव्हा तिने यापूर्वी कधीही पडद्यावर किसिंग सीन केला नव्हता. तिने कथा वाचली आणि म्हणाली, ‘मला समजतंय की कथेसाठी या सीनची गरज आहे,'” असं झोयाने सांगितलं.
झोया म्हणाली, “लैला ही वर्तमानात जगणारी मुलगी आहे. त्यामुळे या सीनची गरज होती. निरोप घेताना तिने असं काहीतरी करणं आवश्यक होतं, ज्यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व दिसून येईल. या सीनमध्ये हृतिक हा ‘स्लीपिंग ब्युटी’ होता आणि कतरिना ‘प्रिन्स’ होती. त्याला जागं करण्यासाठी तिने त्याला किस करणं गरजेचं होतं.”
