बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी यांच्या मुलाविरुद्ध ४२५ कोटी रुपयांच्या ‘क्यूनेट’ घोटाळ्यासंबंधी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आल्याचे वृत्त बुधवारी माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर  आपण किंवा आपल्या मुलाने कोणताही गैरप्रकार केला नसल्याचा खुलासा बोमन इराणीने केला.
‘क्यूनेट’ या मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीवर अनेक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असून, यासंदर्भात अभिनेता बोमन इराणी आणि त्याचा मुलगा दानेशविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
गुरप्रित सिंग आनंद यांनी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘क्यूनेट’विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. गुरप्रित सिंग आनंद याने बुधवारी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्याकडे दानेश याच्याविरोधातही दोन पानी तक्रार दाखल केली. यामध्ये दानेशचा या सर्व प्रकरणाशी कसा संबंध आहे, याची माहिती देण्यात आली आहे.
दानेशने आपल्या वडिलांबरोबर या योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धी केल्याचे त्यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे. असे असले तरी अभिनेता बोमन इराणी या प्रकरणाचा हिस्सा नसल्याचे पोलिसांना वाटते आहे. या विषयी बोमन इराणीने म्हटले आहे की, ‘क्यूनेट’ कंपनीत मी आणि माझ्या मुलाचा सहभाग असल्याची तक्रार एका व्यक्तीने केल्याची माहिती माध्यमांकडे पाठविल्याचे मला कालच समजले. ही एक ‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ कंपनी असून, सध्याच्या घडीला तिची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी होत आहे.
‘क्यूनेट’च्या एका कार्यक्रमाला मी उपस्थित असताना माझा फोटो काढण्यात आला होता. सदर कंपनीशी यापेक्षा जास्त संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसकट कोणत्याही संबंधित विभागाने अद्याप चौकशीसाठी सुचित केलेले नसल्याचेदेखील त्यानी जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे.