आमिरच्या चित्रपटाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल

नुकतंच अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून चित्रपटगृहात जाऊन ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिला.

आमिरच्या चित्रपटाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल
हृतिक रोशन आमीर खान | hritik roshan praise lal singh chaddha

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. गुरुवारी ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडमधल्या काही मातब्बर लोकांनी तसेच समीक्षक मंडळींनी सिनेमाचं कौतुक केलं असलं तरी सामान्य जनतेने चित्रपट नाकारला आहे. नुकतंच अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून चित्रपटगृहात जाऊन ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिला. चित्रपटगृहाबाहेर पडताना त्याला पत्रकारांनी कॅमेरात कैद केलं. त्याने पत्रकारांना काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण काही वेळाने त्याने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली.

हृतिकला सिनेमा चांगलाच आवडला आणि त्याने त्याच्या ट्विटमधून चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक देखील केलं. हृतिक त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो “आत्ताच मी लाल सिंग चड्ढा हा चित्रपट पाहिला आणि त्यामागची खरी भावना मला समजली. या चित्रपटात काय चूक किंवा काय बरोबर या गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येकाने हा चित्रपट बघायलाच हवा, अजिबात चुकवू नका.”

हृतिकच्या ट्विटनंतर काही वेळातच ट्विटरवर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ हा ट्रेंड पाहायला मिळाला. हृतिकने आमीरच्या चित्रपटाचं इतकं तोंडभरुन कौतुक केल्यामुळेच हा ट्रेंड व्हायरल झाला. कित्येकांनी हृतिकच्या या ट्विटवरून त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. हृतिकने केलेलं हे कौतुक प्रेक्षकांना पटलं नाही. त्यांनी त्याच्या आगामी विक्रम वेधा या चित्रपटाला बॉयकॉट केलं पाहिजे, हा ट्रेंड व्हायरल करायला सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर बॉलिवूडचा अंत जवळ आलाय असं म्हणत टीका केली आहे.

Vikram Vedha first look: आर माधवनच्या ‘विक्रम वेधा’चा फर्स्ट लूक

‘विक्रम वेधा’ हा तामीळ चित्रपट पुष्कर-गायत्री या जोडगोळीने दिग्दर्शित केला आहे. मूळ तामीळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती हे दोन सुपरस्टार मुख्य भूमिकेत होते. याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकची चर्चा लॉकडाउनच्या आधीपासूनच सुरू होती. पुष्कर आणि गायत्री हेच दोघे या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान हे बॉलिवूड स्टार आपल्याला पाहायला मिळतील. या मूळ तामिळ चित्रपटाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. तीच कमाल हिंदीच्या या रिमेकमध्ये आपल्याला बघायला मिळणार का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीरला मुंबई पोलिसांची नोटिस, २२ ऑगस्टपर्यंत हजेरी लावली नाही तर..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी