scorecardresearch

राष्ट्रीय चित्रपट दिनाचा ‘ब्रह्मास्त्र’ला घसघशीत फायदा, तिसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी

करोनानंतर २०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिनाचा ‘ब्रह्मास्त्र’ला घसघशीत फायदा, तिसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विविध रेकॉर्ड नोंदवताना दिसत आहे. एकीकडे बॉलिवूडमध्ये सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट मात्र दमदार कमाई करताना दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी या चित्रपटाने ८ कोटी ५० लाखांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल २४७ कोटींची कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त सर्वच चित्रटपगृहांमधील तिकिटांचे दर हे ७५ रुपये करण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे पसंत केले. याचा सर्वाधिक फायदा हा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला झाला. रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी तब्बल ८.५० कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट यात पहिल्या क्रमांकावर आहे.

अनेक चित्रपटगृहातील शो हे सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल पाहायला मिळाले. फक्त ‘ब्रह्मास्त्र’ नव्हे तर अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने आतापर्यंत फक्त हिंदी भाषेत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर सर्व ५ भाषांमध्ये या चित्रपटाने २४७.४३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट २५० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असे बोललं जात आहे. विशेष म्हणजे करोनानंतर २०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या कमाईत ७० टक्के वाढ झाली आहे.

‘ब्रह्मास्त्र’हा चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रमी कमाई केली होती. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी एकत्र काम केलं आहे. त्यासोबतच या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि दिव्येंद्र शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2022 at 08:34 IST

संबंधित बातम्या