|| रेश्मा राईकवार

२००५ साली ‘बंटी और बबली’ प्रदर्शित झाला होता. त्या वेळी हा चित्रपट प्रचंड गाजला. व्यावसायिक चित्रपटाच्या चौकटीत राहून देशातल्या दूर गावखेड्यातून आलेल्या तरुणाईची स्वप्ने काय आहेत? स्वप्नपूर्तीचा त्यांचा संघर्ष कसा असतो? याची झलक दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यात करण्यात आला होता. आता इतक्या वर्षांनंतर तेच बंटी-बबली काय करत असतील किंवा त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची मानसिकता काय असेल, असे दोन प्रश्न उभे राहतात. या दोन्हींपैकी एकावर लक्ष केंद्रित करता आले असते, मात्र सीक्वेलपटातून या दोन्ही गोष्टी एकत्र आणून गोंधळ घालण्यात आला आहे.

ताजमहाल विकण्यासारखे तत्सम घोटाळे करत पैसे कमावणारी बंटी आणि बबलीची जोडी इन्स्पेक्टर दशरथ सिंगच्या सल्ल्यानुसार आयुष्यातला हा थरार सोडून कुटुंबकबिल्यात रमली आहे. त्या काळाचा विचार करता या दोघांचे शिक्षण फार नव्हते, मात्र अंगभूत हुशारीचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला होता. त्यामानाने नव्या बंटी-बबलीची जोडी ही उच्चविद्याविभूषित अशी आहे. कोणत्याही तारांकिताला लाजवेल असे दोघांचे राहणीमान, त्यांची जीवनशैली आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने हॅकिंगपासून सगळ्या तंत्रज्ञानाची करामत करण्याची कलाही त्यांच्याकडे आहे. इतके शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नाही, म्हणून या दोघांनी जुन्या बंटी-बबलीचे नाव घेत जुगाड सुरू केला आहे. गंगा नदी स्वच्छ करून घेऊन ती भाड्यावर देण्याचा पराक्रम, सरकारी गोदामातील अन्नधान्य लुटून ते गरिबांपर्यंत पोहोचवण्याचे पाप-पुण्याचे एकत्रित काम करणाऱ्या या जोडीमुळे जुन्या बंटी-बबलीची जोडी धोक्यात येते. इथे दशरथ सिंगचा चेला म्हणून जटायू सिंग जुन्या बंटी-बबलीच्या मागे लागतो. या खेळात खरी जोडी सापडते का? की जुन्या बंटी-बबलीला त्यांच्या मूळ रूपात यावे लागते? वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचे धागे एकत्र करत ‘बंटी और बबली २’ हा वरुण व्ही. शर्मा दिग्दर्शित चित्रपट आपल्यासमोर साकारला आहे.

मुळात जुनी आणि नवी जोडी एकत्र न आणता जुन्याच जोडीला हाताशी घेत दिग्दर्शकाला हा चमत्कार साधता आला असता. तेवढे तयारीचे कलाकार सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या रूपाने दिग्दर्शकाकडे होते. मात्र त्या दोघांवरच भिस्त न ठेवता नव्या जोडीला पुढे आणले गेले आहे. नव्या आणि जुन्यांचा पाठशिवणीचा खेळ प्रामुख्याने या चित्रपटात पाहायला मिळतो. एके काळी मिस इंडियाचे स्वप्न पाहणारी, जिच्या कपड्यांचा ट्रेण्ड वास्तवातही लोकप्रिय झाला होता, ती बबली या चित्रपटात फारच भडक आणि बटबटीत रूपात समोर येते. सव्यसाचीच्या स्टाईलचे कपडे शिवणारी, आयुष्य सर्वार्थाने मजेने जगणारी बबली आणि तिचा बाह्य अवतार या दोघांचा मेळ काही लागत नाही. त्या तुलनेत पोट सुटलेला, बायकोच्या हुकमानुसार वागणारा आणि तरीही तिच्यावर प्रेम करणारा बंटी बरा वाटतो. मूळ चित्रपटात अभिषेक बच्चनने साकारलेली ही व्यक्तिरेखा सैफ अली खानने उत्तमरीत्या पेलली आहे. राणी मुखर्जीच्या व्यक्तिरेखेचा तामझाम मूळ लेखनात ढासळलेला असला तरी तिने तिच्या अभिनयातून बबलीची व्यक्तिरेखा घट्ट पकडली आहे. भडक अवतारातही ती कमालीच्या सहजतेने वावरली आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ हे दोन्ही नवीन कलाकार उत्तम आहेत. त्यांचा पडद्यावरचा सहज वावर नव्या बंटी आणि बबलीला साजेसा आहे. मात्र कथेतच घिसडघाई झाली असल्याने पडद्यावरचा हा खेळ जमून आलेला नाही. पंकज त्रिपाठीसारख्या कसलेल्या कलाकारालाही काही करण्याची संधी या चित्रपटात मिळालेली नाही.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी वरुण व्ही. शर्मा यांनीच निभावलेली आहे. मात्र जुन्या आणि नव्या बंटी-बबलीला एकत्र आणण्यातही दिग्दर्शकाला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे ढोबळमानाने पहिले नव्यांच्या करामती, मग जुन्यांची भंबेरी, त्यांचा पाठशिवणीचा खेळ या साऱ्या फापटपसाऱ्यात त्यांना एकत्रित पाहण्याचा अनुभवही शेवटच्या काही मिनिटांत प्रेक्षकांना मिळतो. एक ना धड… अशी अवस्था या चित्रपटाची झाली आहे. नव्यांच्या तुलनेत अर्थात जुन्या बंटी-बबलीची गोष्टच जास्त भाव खाऊन जाते हेही तितकेच खरे. शेवटी गोष्ट त्यांच्यापासूनच सुरू झाली होती. फुरसतगंजमधून निघालेली त्यांची घोटाळा एक्स्प्रेस ज्या पद्धतीने प्रेक्षकांची मने जिंकून गेली होती, त्याची इतकीशीही सर या नव्या चित्रपटाला साधता आली नाही, याची राहून राहून खंत वाटते.

बंटी और बबली २

दिग्दर्शक – वरुण व्ही. शर्मा

कलाकार – सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघ, पंकज त्रिपाठी