जगभरात सर्वोत्तम आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच मुख्य चित्रपट स्पर्धा विभागात पायल कापाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाची फक्त निवड झाली नाही तर या स्पर्धा विभागात ‘ग्रान प्री’ पुरस्कारही या चित्रपटाने मिळवला. गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदा भारतीय चित्रपटाने हा सन्मान मिळवला. प्रतिष्ठित महोत्सवात मिळालेला हा पुरस्कार भारतीयांसाठी आनंदाचा किरण ठरला आहे. मात्र गेले दशकभराहून अधिक काळ ‘कान’ महोत्सवात या ना त्या प्रकारे भारतीय चित्रपट आणि कलाकार पोहोचले आहेत. तरीही महोत्सवाच्या मुख्य स्पर्धा विभागापर्यंत आपले चित्रपट का पोहोचू शकले नाहीत?

यंदाचा ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतीय चित्रपटांसाठी खऱ्या अर्थाने आनंदपर्व ठरला आहे. पायल कापाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ चित्रपटाला महोत्सवाच्या मुख्य स्पर्धा विभागात ग्रान प्री पुरस्कार मिळाला. याच महोत्सवाच्या लघुपट स्पर्धा विभागात ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांची निर्मिती असलेला, चिदानंद नाईक दिग्दर्शित ‘द सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ हा लघुपट विजेता ठरला. याशिवाय, ‘द शेमलेस’ या बल्गेरिअन दिग्दर्शक कॉन्स्टॅन्टीन बोयानोवच्या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री अनुसूया गुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘कान’ महोत्सवात भारतीय अभिनेत्रीला मिळालेलाही हा पहिलाच पुरस्कार आहे. पुरस्कारांच्या या आनंददायी धक्क्याबरोबरच मुळात पहिल्यांदा भारतीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात निवडले गेले हीसुद्धा आपल्यासाठी यावर्षी महत्त्वाची बाब ठरली. पण गेली कित्येक वर्षं सातत्याने भारतीय चित्रपट ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध विभागात दाखवले जात आहेत. अनेकदा अनुराग कश्यपपासून नामांकित दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे प्रीमिअर ‘कान’ चित्रपट महोत्सवात होतात. ‘कान’महोत्सवांतर्गत भरवण्यात येणाऱ्या फिल्म बाजार अंतर्गत अनेक चित्रपट तिथे दाखवले जातात. भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यात सहभागी होतात. मराठी चित्रपटही यात मागे नाहीत. महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी तीन मराठी चित्रपटांची निवड केली जाते. हे तीन चित्रपटही ‘कान’ महोत्सवाच्या फिल्म बाजारअंतर्गत दाखवले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, फॅशन डिझायनर सगळ्यांचाच या महोत्सवात रेड कार्पेटपासून ते महोत्सवाचे परीक्षक म्हणून विविध प्रकारे राबता असतो. आणि तरीही आत्तापर्यंत महोत्सवाच्या मुख्य स्पर्धा विभागात भारतीय चित्रपट का पोहोचू शकले नाहीत? याचं एकच एक ठोस कारण देता येणं शक्य नाही असं चित्रपट अभ्यासक, समीक्षक गणेश मतकरी सांगतात.

Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video
नीता अंबानी रोहित शर्माला मिठी मारून रडल्या, तर सूर्याला.. राधिका- अनंतच्या संगीत सोहळ्यातील नवा Video पाहिलात का?
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी
Jasprit Bumrah's Emotional Childhood story
‘बुमराहची आई १६-१८ तास काम करायची…’, एका पोस्टने उलगडले जसप्रीतच्या आयुष्यातील सर्वात मोठे भावनिक क्षण
film industry Composer Madanmohan birth centenary
एक होता गझलवेडा संगीतकार!
Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुळजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?
Mumbai International Film Festival, miff 2024, miff Selection Committee Member, Arun Gongade, Mumbai International Film Festival Showcases 42 shortfims, Maharashtra government should Organize Marathi Film Festival,
मराठी लघुपटांच्या वाढत्या दर्जाला राज्य शासनाचीही दाद हवी!

हेही वाचा >>>Video: “माझं जे काही आहे ते तूच आहेस…”, जिनिलीया देशमुखने धाकट्या लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

‘जगभरात कान, बर्लिन, व्हेनिस, अमेरिकेत सनडान्स, टोरंटो, कार्लोव्ही व्हेरी असे काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव प्रसिद्ध आहेत. ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गेल्या काही वर्षांत खूप प्रसिद्धी मिळाली आहे. गोल्डन ग्लोब, बाफ्ता सारखे आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असताना ऑस्करला जसं महत्त्व प्राप्त झालं आहे तसंच ‘कान’ महोत्सवाच्या बाबतीत म्हणता येईल. प्रत्येक चित्रपट महोत्सवाची स्वत:ची ओळख असते. तिथे कोणत्या प्रकारचे चित्रपट दाखवावेत याचीही संकल्पना ठरलेली असते. त्यामुळे आपल्याकडून तशा पद्धतीचे चित्रपट महोत्सवात जातात का? इथपासून विचार केला पाहिजे’ असे मतकरी यांनी स्पष्ट केले. भारतीय दिग्दर्शकांचे अगदी मराठी चित्रपटही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून निवडले जातात, पुरस्कारही मिळवतात. चैतन्य ताम्हाणेचा चित्रपट व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विजेता ठरला होता. टोरंटोला आपले चित्रपट असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले चित्रपटच नाहीत असं नाही. पण कोणत्या पद्धतीचे चित्रपट आपण या महोत्सवांसाठी निवडतो ही बाबसुद्धा विचारात घ्यावी लागते. ऑस्कर पुरस्कारांसाठी दरवर्षी फेडरेशनकडून चित्रपट पाठवला जातो तेव्हा आपण कुठला चित्रपट पाठवला आहे? त्याच्याबरोबर अन्य कोणते चित्रपट स्पर्धेत आहेत? असे कित्येक घटक महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक देशातून चित्रपट येत असल्याने या स्पर्धा नेहमी अटीतटीच्याच असतात. अगदी ‘कान’ महोत्सवाचा विचार करता तिथे युरोपीय चित्रपटांचा जोर अधिक असतो. त्यामुळे स्पर्धा विभागात पोहोचू शकेल असा चित्रपट गेल्या ३० वर्षांत आपल्याकडून गेलेला नाही हेही कारण असू शकतं, असं मतकरी यांनी सांगितलं. याशिवाय, चित्रपट कसे तिथपर्यंत पोहोचवायचे याच्या पद्धतींमुळेही फरक पडत असल्याचं त्यांनी सांगितलं.

जगभरातील १८ चित्रपटांमधून पुरस्कारासाठी निवड होणं ही निश्चितच आपल्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे, पण आपल्याकडून आत्तापर्यंत चित्रपट कान महोत्सवातील स्पर्धा विभागात जातच नव्हते, असं म्हणणं चुकीचं आहे असं महोत्सवातील चित्रपट वितरण, आयोजनाचा दीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या फिल्म क्युरेटर प्रसाद खातू यांनी सांगितलं. भारतीय चित्रपट दरवर्षी स्वतंत्रपणे कान महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी पाठवले जातात. पण प्रत्येक चित्रपट महोत्सवाचं वेगळेपण आहे, त्यांच्या नियोजनानुसार चित्रपटांचीही निवड होत असते. त्यामुळे आपण पाठवलेले चित्रपट त्यांनी ठरवलेल्या निकषांवर खरे उतरत नसतील वा कमी पडत असतील तर ते चित्रपट स्पर्धा विभागातून बाहेर पडतात. मग त्यांचा महोत्सवाच्या ‘अनसर्टन रिगार्ड’सारख्या इतर स्पर्धाबाह्य विभागांमध्ये समावेश केला जातो. ‘कान’ची आणखी एक खासियत म्हणजे कोणत्याही देशाचे चांगले चित्रपट महोत्सवातून बाहेर काढण्यापेक्षा प्रीमिअर शो वा अन्य विभागांच्या माध्यमातून ते दाखवण्यावर अधिक भर दिला जातो. जेणेकरून त्या त्या देशामध्ये महोत्सवाची चर्चा होते, प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ‘कान’चे रेड कार्पेट, निवडक चित्रपटांचे प्रीमिअर शो किंवा देशोदेशीच्या चित्रपटकर्मींना महोत्सवात प्रतिनिधित्व देणं अशाप्रकारे जाणीवपूर्वक महोत्सवाचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो, असे खातू यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत भारतीय चित्रपट आणि चित्रपटकर्मी सातत्याने ‘कान’ महोत्सवात सहभागी होत राहिले आहेत. त्यामुळेही आपल्या चित्रपटांविषयी एक सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्याचाही परिणाम असू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तेही ‘कान’सारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही. अशाप्रकारे वैश्विक स्तरावर भारतीय चित्रपटांना ओळख मिळावी यासाठी चित्रपटकर्मी गेली काही वर्षं सातत्याने प्रयत्नशील आहेत. महोत्सवात चित्रपटांना स्थान मिळवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, मात्र त्यासाठी अविरत सुरू असलेल्या धडपडीतूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणं यशसाध्य होत आहे.