बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाला न्यायालयात दाखवण्याच्या निर्णयावर बॉलिवूडचे निर्माता महेश भट्ट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला यू/ए सर्टिफिकेट दिले असताना चित्रपटातील काही आक्षेपामुळे चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. सेन्सॉरची परवानगीनंतर चित्रपटावर आक्षेप नोंदविणाऱ्या याचिकाकर्त्याची बाजू समजून घेण्यासाठी चित्रपटाला कोर्टात दाखविण्यावर भट्ट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय म्हणजे सेन्सॉर बोर्डाला काहीच किंमत नसल्यासारखे त्यांना वाटते. महेश भट्ट यांनी त्यांची भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.  सेन्सॉर बोर्डाचा काहीच उपयोग नाही का? असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या आगामी चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. या चित्रपटातून वकिलांची आणि न्यायाधीशांची बदनामी करण्यात आली आहे, असा आरोप या चित्रपटावर करण्यात आला होता.  अजय कुमार वाघमारे नावाच्या एका वकिलाने उच्च न्यायालयात या चित्रपटा विरोधात याचिका दाखल केली होती. या चित्रपटाच्या नावातून एलएलबी हा शब्द वगळण्यात यावा. तसेच न्यायालयात वकील पत्ते खेळताना दाखवण्यात आले असल्याचे दृश्यही वगळण्यात यावे अशीही मागणी त्याने केली होती. याचिकेत हेही सांगण्यात आले होते की कायद्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही प्रतिबंधनही आहेत.  या चित्रपटात न्यायालयाशी निगडीत लोकांचे विनोदी चित्रण करण्यात आले असल्याचा उल्लेख देखील याचिकेत करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औंरगाबादच्या खंडपीठाने ‘जॉलीएलएलबी २’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी पाहण्यासाठी दोन अमायकस क्युरीची (न्याय मित्र) नियुक्ती केली होती. यापार्श्वभूमीवर भट्ट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधीच्या चित्रपटात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘जॉली एलएलबी २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. एका किचकट खटल्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक यावर हा ट्रेलर भाष्य करतो. ट्रेलरला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.