CELEBRITY BLOG : बच्चन ओ बच्चन!

एखाद्या लहान मुलानं किंवा चित्रकलेचं फारसं अंग नसलेल्या माणसानं अमिताभ यांचं चित्र काढल्यावर ते कसं असेल तसे हे बच्चन माझ्यासमोर उभे होते..

तो बच्चन कुठंय रे..
त्या बच्चनला बोलवा ना..
पाणी घे रे बच्चन.. (पाणी, पानी)
ए.. बच्चन.. तुला एकच गोष्ट काय दहा वेळा सांगायची का..?
झोपला का बच्चन..?
बच्चनचं लक्ष नाही कामात…
कोल्हापूरला एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा हा संवाद..
मला उमगेनाच की हे असं कसं काय संबोधन…?
चौकशीअंती कळलं की सेटवरच्या एका स्पॉट बॉयचं नाव बच्चन होतं..
सिनेमा क्षेत्रातल्या सगळय़ात शेवटच्या पण महत्त्वाच्या हुद्यावर असलेल्या इसमाचं नाव बच्चन..???
अगदीच विरोधाभास होता… त्यांना बोलावलं..
‘स्पॉट बॉय’ या नावाखाली पन्नाशीतला एक पुरुष समोर येऊन उभा राहिला.
उंची सन्माननीय अमिताभजींसारखीच..
चेहऱ्यावर बारीकसं हास्य..
त्यातून थोडे पुढे आलेले दात दिसतात
दाढीची पांढरी खुंटं डोकावतायत..
तशीच मिशीही..
एखाद्या लहान मुलानं किंवा चित्रकलेचं फारसं अंग नसलेल्या माणसानं अमिताभ यांचं चित्र काढल्यावर ते कसं असेल तसे हे बच्चन माझ्यासमोर उभे होते..
पण चेहऱ्यावरचा निरागस भाव अगदी अस्सल होता.. तो पकडायला, रेखाटायला मनस्वी चित्रकारच हवा..
तुम्ही ‘बच्चन’ का..? मी
हो..
सगळे बच्चनच म्हणतात..
शेजारचे पाजारचे, मित्रमंडळी, गावाकडचे, ओळखीचे.. आपल्या फील्डमधले..
सगळे बच्चनच म्हणतात..
बायको पण पाठीमागे बच्चनच म्हणते
मुलं बच्चन म्हणत नाहीत..
का..? बच्चन का म्हणतात?
मी ‘इट्स मॅड मॅड वर्ल्ड’ या एकांकिकेत काम केलं होतं. त्यात मी बच्चन यांची भूमिका करायचो..
तेव्हापासून सगळे मला बच्चनच म्हणतात..
मला खूप भारी वाटायचं..
मी बच्चन यांच्यासारखा होतो की नाही मला माहीत नाही, पण मी माझा मलाच बच्चन यांच्यासारखा दिसू लागलो.
मग काय मुंबईला गेलो सिनेमात काम करण्यासाठी बच्चन यांना भेटायचा खूप प्रयत्न केला
पण जमलं नाही..
मग जी. पी. सिप्पी यांना भेटलो..
ते म्हणाले, काही काम निघालं तर कळवतो.
बऱ्याच लोकांना भेटलो.. पण कुणीच काम दिलं नाही..
मी ‘मी’ नव्हतोच मला वाटतं..
बच्चन साहेबांचा डुप्लिकेट, डमी त्यांच्यासारखा दिसणारा अशी ओळख होती माझी..
जी दुसऱ्याची ओळख ती आपली ओळख असेल तर आपली ओळख कुठंय..?
मी अजूनही माझी ओळख शोधतोय..बच्चन साहेबांनी ‘कुली’मध्ये घातलेला ड्रेस मी शिवून घेतला.. ‘डॉन’मधले कपडे, ‘याराना’चा लायटिंगचा ड्रेस घालून मी डान्स केला होता..
खूप लोकांनी कौतुक केलं..
म्हणाले, सेम बच्चन.. एकदम सेम बच्चन..
आता स्पॉट बॉयचं (?) काम करतो..
नटांना चहा-पाणी देतो.
सेवक (काहींसाठी हरकाम्या) आहे मी..
मला एक क्षण वाटून गेलं..
एक ते बच्चन ज्यांची सेवा करायला सगळा भारत तयार आहे.. आणि हा एक आपला बच्चन इथं नटांची सेवा करतोय.. पण तो त्यात खूश आहे… निरागसत्व काय ते हेच..
आता मुलांना पण याच फील्डमध्ये आणायचंय..?
का.. कशाला..?
या फील्डमध्ये आपला वारसा चालवणारा कुणीतरी पाहिजे ना..? त्याला सेटिंग (art direction) मध्ये टाकायचंय..
सिनेमाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना..
आपल्यापेक्षा कुशल-अर्धकुशल लोकांना सर्व काही मिळत असताना, ते पाहात असताना.. हातात यश नावाचं काहीच जरी पडत नसलं
तरी ओंजळ रिकामी असल्याचं काडीमात्र दु:ख नसलेल्या अशा शिलेदाराला मनस्वी सलाम..!

ता. क.
याचं नाव राजेश पंडीत आहे.
पण त्यांना बच्चन म्हणूनच हाक मारा..
तरच ते ‘ओ’ देतील..
त्यांना बरं वाटतं ते..

– मिलिंद शिंदे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Celebrity blog by actor milind shinde on spot boy whos name is bachchan

ताज्या बातम्या