CELEBRITY BLOG : नुसतंच जगणं कसं काय जमतं कुणास ठाऊक…?

… आणि दुसरीकडे गॉगल लावून मावा खाऊन मोठमोठ्यानं हॉर्न वाजवून नुसतं निरुद्देश जगत राहणारी ही टाळकी, टोळकी.

साधारण दीड तास झाला असेल…
मी त्याला पाहात होतो. तो रमलेला त्याच्या अभ्यासात. शुटिंगसाठी एका खेडेगावात गेलो होतो, दोन शॉटमधल्या वेळेत माझी बसण्याची व्यवस्था ज्या घरात केली होती. तिथे अभ्यास करणारा हा मुलगा.
दीड तास तो स्वतःशीच काहीतरी बोलतोय. च्यक… च्यक… करून गणित सोडवतोय की चुकतो काहीच कळेना…
मला वाटलं, आपण त्याला पाहतोय म्हणून तो कॉन्शस तर होत नसावा…!
मी शक्य तेवढं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू लागलो. पण त्याचं अभ्यासात गुंतलेलं ध्यान माझं लक्ष वेधून घेत होतं.
मी राहून राहून त्याच्याकडे पाही.
तुम्हाला प्रॉफिट काय या सगळ्यात…? या त्याच्या डायरेक्ट वाक्यानं आमच्यातला संवाद सुरू झाला.
प्रॉफिट…? मी.
हो, आता तुम्ही हा सिनेमा करता… समजा पडला किंवा रिलिजच नाही झाला तर तुमचा प्रॉफिट कसा असतो…?
त्याचं प्रॉफिटचं परिमाण मला स्तिमीत करून गेलं. मी त्याला चित्रपटपश्चात निर्मितीबद्दल सांगितलं. पण बाकी काही न बोलता हा मुलगा जो नवव्या इयत्तेत शिकत होता तो बाकी काहीही न बोलता फक्त प्रॉफिट या विषयावर का बरं आला असेल? मी चिकित्सक झालो.
इंग्लिश मीडियम…? मी.
“नाही ना, गरिबय ओ आम्ही, मिडल क्लास. पण, मी शिकलोना की ही सगळी गरिबी जाईल आपोआप”
माझ्यात ऊर्जाच आली.
मी शिकून पैसे कमवून घर घेणार मोठं, हे लहान आहे ना…
काय करणार पुढे…? माझा प्रश्न.
UPSC की IIT करू…? त्याचा मला उलटा प्रश्न.
दोन्ही चांगलंच आहे. त्याच्या मनातंल द्वंद्वं न वाढवता म्हणालो…
————–
रात्रीच शुटिंग, गर्दीच्या ठिकाणी.
बाजारातली मंडळी आपापल्या त्वरेत
एका कोपऱयातून हसण्याचा, खिदळण्याचा, हिणकस कॉमेंटस पास करण्याचे आवाज. नुसतं खिदीखिदी… मोठमोठ्यानं सगळ्यांच लक्ष आपल्याकडेच वेधलं पाहिजे, असं ते आचकट…विचकट…
सिगारेटच्या कफनं खळ्ळsss खळ्ळsss वाजणाऱया छात्या, अनावश्यक कॉमेंट्स, घाणेरड्या शिव्या… त्या इतरांना ऐकू जाव्यात अशीच उच्चारणं.
विटून जायला होतं…
हे स्वतःला स्वयंघोषित जहागीरदार समजत असतात सदर ठिकाणाचे.
लक्ष दिल की त्यांना मजा येते, दुर्लक्ष केलं की असे विझतात की जणू चार-चौघात यांच्या कुणी कानाखाली मारलीये…
पण काही याही पुढचे असतात
दखल घ्यायलाच लावतात. तिथं कसरत होते, दुर्लक्ष करण्यासाठी
बहुतेक नेहमी लक्ष वेधून घेणारे आपण (मोठमोठ्यानं हॉर्न वाजवणारे, सायलेन्सर नसलेली गाडी रेस करून पळवणारे, चित्रविचित्र आवाज काढणारे, सिग्नल रेड असेल तरी हॉर्न वाजवणारे, ग्रीन सिग्नल मिळाला तरी हॉर्न वाजवणारे, टोलनाक्यावर टोल भरणाऱया गाडीचालकांना पैसेही मोजून न घेऊ देणारे व हॉर्न वाजवणारे…इत्यादी) आपण आज दुर्लक्षित कसे…?
यातून ते येत असावं बहुतेक. द्वंद्वं…
—————
एकीकडे मी शिकून मोठा होऊन माझ्या वडलांची गरिबी संपवून टाकीन, असं म्हणणारा हा अभ्यास करणारा मुलगा आणि दुसरीकडे गॉगल लावून मावा खाऊन मोठमोठ्यानं हॉर्न वाजवून नुसतं निरुद्देश जगत राहणारी ही टाळकी, टोळकी.
नुसतंच जगणं कसं काय जमतं कुणास ठाऊक…?
ता.क.
दगडावरची पेरणी
– मिलिंद शिंदे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Celebrity blog by milind shinde on social inequality