बॉलीवूड तारेतारकांच्या रुपेरी पडद्यावरच्या प्रेमकथा जशा सर्वसामान्यांना भावतात, तसंच त्यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नांबद्दलही जनमानसात उत्सुकता असते. त्यामुळेच अमुक एक अभिनेता दुसऱ्या एका अभिनेत्रीबरोबर परदेशात सुट्टीची मजा अनुभवतो आहे इथपासून एखाद्या अभिनेत्याने एखाद्या अभिनेत्रीच्या छायाचित्राच्या पोस्टवर हार्ट इमोजी टाकले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशा चर्चा रंगायला लागतात. आणि मग खरोखरच त्यांनी आपल्या जाहीर प्रेमाची कबुली दिली असेल वा नसेल त्यांच्या लग्नाची चर्चा एकदम जोर धरायला लागते. अशा कित्येक लग्नकथा सध्या बॉलीवूडमध्ये गाजत आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नाच्या चर्चाचे हे वादळ आपल्या वाटय़ाला येऊ नये म्हणून अनेक जोडय़ा हल्ली प्रेमाच्या बाबतीत अळीमिळी गुपचिळी असतात. अगदी गुपचूप आपापल्या शहरांमध्ये, मुंबईपासून दूर लग्नसोहळेही उरकले जातात. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांचा विवाहसोहळा असाच गाजावाजा न करता पार पडला. आता लग्न झाल्यानंतर त्यांची संगीत-मेंदीपासून ते मधुचंद्राला निघण्यापर्यंतच्या छायाचित्रांची एकच उधळण समाजमाध्यमांवर झाली आहे. अभिनेता रणबीर कपूर गेली तीन वर्षे अभिनेत्री आलिया भट्टच्या प्रेमात आहे. त्या दोघांच्या प्रेमाचं हे गुपित फार काळ टिकू शकलं नाही. त्यांनीही ते लपवलं नाही. त्याबद्दल ते फारसे व्यक्त होत नाहीत, हेही तितकंच खरं..  रणबीर आणि आलियाच्या घरचेही एकमेकांशी तितकीच जवळीक ठेवून आहेत. आलिया अनेकदा कपूर कुटुंबीयांच्या कार्यक्रमांना, सुख-दु:खात हजर असते. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गोष्ट कुठेही लपून राहिलेली नाही, पण त्यांच्या लग्नाची सुरू झालेली चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. करोना नसता तर आमचे लग्न एव्हाना झाले असते, अशी रणबीरने दिलेली कबुली हे निमित्त ठरले. तेव्हापासून हे जोडपं या वर्षी या महिन्यात लग्न करणार आहे, अशा चर्चाचा सिलसिलाच सुरू झाला आहे. अजूनही ते दोघं काही लग्न करत नाही आहेत, पण त्यांच्या लग्नाची गोष्ट मात्र दिवसेंदिवस रंगतच चालली आहे.

लग्नाच्या चर्चेतून वर- वधूच गायब आहेत, मात्र लग्नमंडप सजतो आहे. तारखा ठरल्या आहेत, घरातले अमुक दिवशी एकत्र येणार आहेत.. अशा अनेक दंतकथांनी सजलेली गोष्ट आहे ती कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची. कतरिना आणि विकी कुठल्या ना कुठल्या पार्टीत एकत्र दिसत असल्यापासून त्यांच्या लग्नकथेच्या चर्चाना उधाण आले आहे. प्रत्यक्षात या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुलीही दिलेली नाही. अनेकदा या चर्चा वायफळ असल्याची भूमिका विकी कौशलच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केली आहे. तरीही या डिसेंबरमध्ये दोघे विवाहबद्ध होणारच याबद्दल सगळे ठाम झाले आहेत.

कतरिना – विकी कुठे लग्न करणार, परदेशात की भारतात करणार, त्यांचे बजेट किती असेल, लग्न करणार त्या हॉटेलचे नाव काय, त्यांच्या घरच्यांचे काय म्हणणे आहे वगैरे वगैरे सर्व तऱ्हेच्या बातम्यांचा खयाली पुलाव रंगतो आहे. मात्र या चर्चाकडे तथाकथित वर आणि वधूने अजिबात लक्ष दिलेले नसल्याने त्यांच्या लग्नाची ही दंतकथाच ठरते की काय.. असे वाटू लागले आहे.

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सलमान खानच्या घरची सून होणार, या चर्चेने सुरुवातीला सगळ्यांचीच झोप उडाली. मात्र सलमानचा भाऊ सोहैल खानचा मेहुणा बंटी सचदेवा याच्याशी सोनालीची लग्नगाठ बांधली जाणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्या अर्थाने ती सलीम खान यांच्या घरची सून होणार, अशी चर्चा रंगली आहे. बंटी सचदेवा आणि सोनाक्षी हे खूप आधीपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस त्यांच्या लग्नाच्या गोष्टी रंगू लागतील. अभिनेत्री तारा सुतारिया आणि अदार जैन यांच्याही लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लग्नकथांचा हा नवा अध्याय सुरू होईल. तोपर्यंत राजकुमार राव-पत्रलेखा आणि अभिनेता आदित्य सील- अनुष्का रंजन यांच्या झालेल्या लग्नाच्या गोष्टी रंजन करण्यासाठी पुरेशा आहेत. अभिनेता आमिर खान आता अभिनेत्री फतिमा सना शेख हिच्याशी तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या बातम्याही जोर धरत आहेत. खरंतर या लग्नकथांनी आपल्याला फारसा फरक पडत नाही. मात्र तरीही त्यांनी त्यांचे प्रेम वा लग्नाची गोष्ट जाहीर करेपर्यंत थोडा धीर धरायला काहीच हरकत नसावी. पण तेवढा संयमच कोणापाशी उरलेला नाही. त्यामुळे सत्य असो वा कल्पना अनेकदा तर तथाकथित लग्नांच्याच चर्चा रंगत राहतात. प्रत्यक्षात घडत काहीच नाही. तरीही बॉलीवूडी लग्नकथांचा हा अध्याय असाच सुरू राहणार यात शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrity couples likely to get married upcoming wedding in bollywood zws
First published on: 28-11-2021 at 00:01 IST