बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी तर मन्नतसमोर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला. इतर ठिकाणी देखील हेच चित्र पाहायला मिळालं.

आर्यन खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच बॉलिवूडमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. आर्यन खानला अटक झाल्यापासून त्याला जामीन मिळेपर्यंत अनेकांनी खान कुटुंबाला समर्थन देणारे ट्वीट केले होते. आर्यनला जामीन मिळताच अनेक कलाकारांनी शाहरुख खानचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

बॉलिवूड अभिनेता आर माधवनने आर्यनला जामीन मिळाल्यानंतर ट्वीट केले आहे. “देवाचे खूप खूप आभार. एक बाप म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे”, असे ट्वीट आर माधवनने केले आहे.

तर अभिनेता सोनू सूदने ट्वीट करत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे. “काळ जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा साक्षीदारांची गरज नसते”, अशा आशयाचे ट्वीट सोनूने केले आहे. सोनूने केलेल्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच दिग्दर्शक हंसल मेहताने ट्वीट करत ‘मी आज रात्री पार्टी करणार’ असल्याचे सांगितले.

त्यासोबत प्रसिद्ध गायक मिका सिंहने ट्वीट करत आर्यनला पाठिंबा दिला. ‘आर्यन तुझे अभिनंदन, अखेर तुला जामीन मिळाला याचा मला फार आनंद आहे. भगवान के घर देर है, अंधेर नही. तू आम्हा सर्वांना खूप साथ दिली आहेस, त्यामुळे देव तुझी आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घेईल,’ असे मिका सिंह म्हणाला.

तर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ‘अखेर’ असे ट्वीट केले आहे. संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरने आर्यन खानसोबतचा एक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.

तर मलायका अरोराने खान कुटुंबाचा एक फोटो पोस्ट करत ‘फक्त प्रेम’ असं लिहिले आहे.

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.

आर्यनसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”