सेलिब्रिटी लेखक : आठवणी दाटतात..!

तिचा सहवास म्हणजे माझ्यासाठी आयुष्य कसं जगायचं या शिकवणीची शिदोरीच!

Swanandi Tikekar grand mother
माझी सगळ्यात आवडती व्यक्ती, माझी आजी

माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे माझी आजी! तिची आणि माझी गट्टी एकदम पहिल्यापासूनच. तिचा सहवास म्हणजे माझ्यासाठी आयुष्य कसं जगायचं या शिकवणीची शिदोरीच!

शाळेची घंटा तीन वाजून तीस मिनिटांनी व्हायची आणि मी माझी बॅग शक्य तितक्या भराभर भरून शाळेच्या बाहेर पळत सुटायचे. आमची तारा माझ्याबरोबर आणखीन आठ-नऊ मुलींना चालत घरी सोडायला यायची. आमच्या सगळ्यांच्या बास्केट्स आणि दप्तरं घेऊन ती बिचारी छोटय़ा रोपटय़ासारखी दिसायची; ज्या रोपटय़ावर न पेलणारी फळं लगडलीएत. तिच्याबरोबर, तिला छळत, गाणी म्हणत आम्ही सगळ्या जणी आमच्या सोसायटीमध्ये यायचो. सकाळी नऊपासून शाळेत असायचो, त्यामुळे कधी एकदा घरी जाऊन युनिफॉर्म बदलतोय असं व्हायचं. लिफ्टची वाट न बघताच जिन्यानेच तीन मजले चढत यायचे. घराचं दार उघडं असायचं, पण दिवाणखान्यात कोणी बसलेलं नसायचं, स्वयंपाकघरातला दिवा चालू असायचा, आणि मी जाळीच्या दरवाजाचा आवाज केला की अत्यंत सात्त्विक रूपाची, सुंदर, नाजूक, कमरेत पदर खोचलेली पण अत्यंत नीटनेटकी अशी माझी आजी बाहेर यायची, ‘आली का माझी सानू घरी’ असं ती म्हणाली की मी लगेच तणतण करून भूक लागलीय असं म्हणायचे. मग ‘धिरडं आणि छुंदा केलाय आणि ताजं लोणीपण काढलंय’ असं तिने म्हटलं की मग ‘दामिनी’ या मालिकेच्या शीर्षकगीतावर मी आनंदाने गरमागरम धिरडी खायचे.

माझी आजी म्हणजे सुमती टिकेकर. सुप्रसिद्ध गायिका, संस्कृत नाटकांमधून, संगीत नाटकांमध्ये कामं केलेली अभिनेत्री आणि अत्यंत गोड व्यक्तिमत्त्व. माझं सगळ्यात मोठं भाग्य की मी तिच्या सहवासात वाढले. माझ्या लहानपणी आई, बाबा दोघेही कामानिमित्त बाहेर असायचे. पण आमच्याबरोबर खंबीरपणे उभी राहिली ती माझी आजी. मी तिची अत्यंत लाडकी, म्हणजे मी जे म्हणेन ते खायला, प्यायला मिळणार. ती मला कितीही वाजता घ्यायला यायला तयार असायची. फक्त मीच नाही, माझी आई जेव्हा दोन, तीन महिन्यांचे परदेशी दौरे करून यायची तेव्हा आजी रात्री कितीही वाजले तरी गरम वरणभाताचा कुकर, बिरडय़ाची उसळ, आणि चिंच-गुळाची आमटी करायची. का, तर तिला तिकडे नीट घरचं खायला मिळालं नसेल; म्हणून आल्या आल्या खाल्लं तर तिला बरं वाटेल. आम्ही तर घरातले झालो, पण घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाला काहीतरी हातावर ठेवल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही असा तिचा नियमच होता. तिला स्वयंपाकाची अत्यंत आवड होती. आणि सगळ्यांना खायला घालायचीसुद्धा. हे खायला घालणं साधंसुधं अजिबात नाही; तर सगळं साग्रसंगीत! म्हणजे मसाल्याचं दूध केलं तर बदाम, पिस्ते वेलची आणि भरपूर केशर. किंवा बासुंदी केली तर ती नुसतं आपलं करून टाकायची असं नाही. दोन तास ते दूध छान घोटत उभं राहून परफेक्टच बनलं पाहिजे.

अशी माणसं जन्माला येणंच आता बंद झालंय, असं वाटतं. दुसऱ्यांच्या आनंदात खरा आनंद मानणारी माणसं ही आजी-आजोबांच्या पिढीत लुप्त झाली बहुधा. किती छोटय़ा छोटय़ा गोष्टी; कोणाहीकडे गेलं तर काही तरी घेऊन जायचं. तेही दुकानातून तयार असलेला पदार्थ न नेता स्वत: घरी बनवलेला दुधी हलवा घेऊन जायचा, असा तिचा आग्रहच असायचा. माझ्याशी किंवा आजोबांशी कितीही भांडण झालं असलं तरी सकाळी उठल्यावर मनात कोणतीही अढी न ठेवता आमच्यासाठी सगळं करणं हे तिने अगदी नित्यनियमाने केलं. त्यातही मला किती आणि कसं करावं लागतंय ही नाइलाजाची भावना मुळीच नसायची. कारण मनापासून ती आमच्यासाठी सगळं करत असे. माझे आईबाबा त्यांच्या कामांमध्ये व्यग्र असायचे. मला आता असं वाटतं की आईबाबांपेक्षाही आजी-आजोबांबरोबरचं बालपण हे खूप वेगळं असतं आणि अत्यंत महत्त्वाचंसुद्धा!

माझी आजी प्रचंड हौशी. आमच्या वाडीत निरनिराळ्या स्पर्धा व्हायच्या. ती सगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायची. भगिनी मंडळाच्या संगीत रंगभूमीवर ‘स्त्रीजीवन’ ही थीम घेऊन तिने संगीत नाटकातल्या सगळ्या महत्त्वाच्या स्त्री भूमिका घेऊन त्याचा प्रवास दाखवायचा ठरवलं. सोसायटीमध्ये अनेक नाटय़संगीत गाणारे काही हौशी काही व्यावसायिक कलाकार होतेच. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या भूमिका वाटल्या गेल्या. सूत्रधार म्हणून नारदमुनी आणि एक स्त्री सूत्रधार अशी जोडी होती. ते हा संपूर्ण प्रवास उलगडायचे. या सगळ्यांचीच भाषा प्रचंड अवघड होती. मी तेव्हा सातवीत किंवा आठवीत असेन. त्यामुळे तालमी बघताना अध्र्या गोष्टी डोक्यावरूनच जायच्या. पण तालमी सुरू होत्या. बरोबर चार दिवस आधी अचानक आमचा नारदमुनी आजारी पडला. त्यामुळे घरातलं वातावरण भयानक झालं होतं. मग वाडीतील अजून दोन-तीन पुरुष कलाकारांना विचारण्यात आलं की तुम्ही कराल का? दोन दिवस राहिले असताना मी, आई, आजी आणि वाडीतील इतर बायका एकीच्या घरात डोक्याला हात लावून बसलो होतो. आणि माझी आई सहज म्हणाली, ‘स्वानंदी करेल की.’ ती हे म्हणून उठून कॉफी आणायला आत गेली. मला कळलंही नाही अचानक हे सगळं माझ्यावर कसं काय आलं होतं. मी आपली एकटी बसून त्या सगळ्यांच्या माझ्याकडे बघणाऱ्या डोळ्यांकडे बघत होते. शेवटी शाळेला दांडी मारून घरी पाठांतर करून घेतलं आजीने. टेन्शनमुळे मला एका दिवसात खोकला झाला. अख्खा प्रयोग खोकत केला, पण एकही नाव, एकही साल न चुकवता मी स्टेजवर तीन तास लढत होते.

आजीला जाऊन तीन ते चार र्वष झाली. माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त दु:ख झालेली घटना हीच आहे. आत्ताच संक्रांतीला कुणी तरी विकतचा तिळगूळ दिला होता. तो खाऊन टचकन डोळ्यांत पाणी आलं. आजी होती तेव्हा सगळ्यांना, घराला एक शान होती. तिने केलेला तिळगूळ मी कोणालाही द्यायचे नाही. त्यासाठी मी भांडायचे. तिच्याबराब्ेार रोज रामरक्षा म्हटल्याशिवाय मला चैन पडायचं नाही. तिची आठवण काढल्याशिवाय एकही दिवस जात नाही. तिच्यासारखं एक टक्का तरी आपल्याला होता आलं पाहिजे, असं नेहमी वाटतं.

आज मी जे काही आहे त्याचं सगळ्यात जास्त श्रेय मी आजीला देते. माझ्या करिअरची सुरुवात व्हायच्या आधीच ती गेली. ती असती तर तिचे कौतुकाने भरलेले डोळे कसे दिसले असते हे अजूनही दिसतं मला. एका कवितांच्या कार्यक्रमात शांता शेळकेंची कविता वाचली आणि माझ्या मनातच बसली. ‘पैठणी’ या कवितेत त्या असं म्हणतात की, ‘फडताळात काही जुने कपडे आहेत आणि त्यात अगदी तळाशी आजीची पैठणी आहे. तिने तिच्या लग्नात नेसली होती.’ त्या पैठणीत अख्खं आयुष्य उलगडलेलं दिसतंय.

‘कधी तरी ही पैठणी

मी धरते उरी कवटाळून,

मऊ रेश्मी स्पर्शामध्ये

आज्जी मला भेटते जवळून

मधली वर्षे गळून पडतात,

काल पटाचा जुळतो धागा,

पैठणीच्या चौकडय़ांनो,

आजीला माझे कुशल सांगा’

-स्वानंदी टिकेकर

response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Celebrity writer article by swanandi tikekar