scorecardresearch

सेलिब्रिटी लेखक : थोडा वेळ स्वत:साठी..!- अभिजीत खांडकेकर

या गोष्टी इतरांना सांगण्याच्या नादात आपण स्वत:लाच मागे सारतोय

सेलिब्रिटी लेखक : थोडा वेळ स्वत:साठी..!- अभिजीत खांडकेकर

आपण काय करतो, कसे असतो हे सांगण्याचा आटापिटा अनेक जण करतात. या गोष्टी इतरांना सांगण्याच्या नादात आपण स्वत:लाच मागे सारतोय. पण आता गरज आहे ती स्वत:ला थोडा वेळ देण्यासाठी!

प्रत्येक जण किती बिझी आहे हे सांगण्याची अहमहमिका लागलेली असते. मग तो माणूस आयटी क्षेत्रातला असो, कलाकार असो, एखाद्या कंपनीत नोकरी करणारा माणूस असो किंवा अगदी शाळेत जाणारा मुलगा असो. प्रत्येकजण बिझी असतो आणि ते तो सतत सांगतही असतो. शाळेतली मुलं वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, क्लासेसमध्ये इतकी अडकलेली असतात की ते सुट्टीतही हेच करताना दिसतात. मोठय़ांबद्दल बोलायचं झालं तर आपला प्रवासातच बराचसा वेळ जातो. घरी आल्यावरही एक तर आपण कामाबद्दल बोलत असतो किंवा मनोरंजनाच्या माध्यमांचा उपभोग घेत असतो. त्यातही खरेदीला जायचं म्हटलं तरी त्याचीही अ‍ॅप्स आता मोबाइलवर उपलब्ध आहेत; त्यामुळे खरेदीलाही प्रत्यक्ष कुठे न जाता घरबसल्या आपण खरेदी करू शकतो. पण, या सगळ्यात स्वत:ला वेळ कुठे दिला जातो? मिळालेला मोकळा वेळ एक तर विविध अ‍ॅप्समध्ये जातो नाहीतर सोशल मीडियावर जातो. स्वत:साठी वेळ काढला जातोय का? तर याचं उत्तर बहुतेकांकडे मिळणार नाही.

काही कार्यक्रमांनिमित्त मी परदेशात जातो तेव्हा तिथे वीकेण्ड साजरा केलेला नेहमी बघतो. वीकेण्ड फक्त आरामासाठी असतो तिथे. पाच दिवस भरपूर काम करून झाल्यावर दोन दिवस तिथले लोक स्वत:साठी देतात. हा वेळ स्वत:साठी देणं म्हणजे वैयक्तिक आयुष्याला वेळ देणं. हे वैयक्तिक आयुष्य आपण कुठेतरी विसरत चाललोय, असं मला वाटतं. यामध्ये दोन गोष्टी मला जाणवतात. वैयक्तिक आयुष्य राहिलेलंच नाही हे एक आणि दुसरं म्हणजे ते आपल्याला ठेवायचंच नाही हे एक. या दोन्ही गोष्टीला शंभर टक्के नसलं तरी काही प्रमाणात सोशल मीडिया कारणीभूत आहे. माझ्या अमेरिकेतल्या भावाला मी सहज एकदा विचारलं होतं की तुझी फेसबुक प्रोफाइल दिसत नाही. तर त्याने ती घाबरून डिलीट केल्याचं मला सांगितलं. ‘घाबरून डिलीट?’ हे काही मला कळलं नाही. मी त्याला त्याबाबत आणखी थोडं विचारलं. तेव्हा त्याने मला त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. तो तिथल्या एका मोठय़ा कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. एकदा त्याचे एक साहेब जपानवरून येणार होते. माझा भाऊ आणि ते पहिल्यांदाच भेटणार होते. पण तोपर्यंत ते दोघेही ईमेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असायचे. त्यांची भेट झाली तेव्हा त्या साहेबांनी भावाला विचारलं की, टिपू कसा आहे? माझ्या भावाला काही कळेना की त्याच्या कुत्र्याचं नाव याला कसं माहिती? मग त्याने त्यांना विचारलं की, तो बरा आहे पण त्याचं नाव, त्याच्याबद्दल तुम्हाला कसं माहिती? तर त्यावर ते म्हणाले की, अरे, फेसबुकवर तू टाकतच असतोस ना बरंच काय काय. त्यातूनच कळलं मला त्याचं नाव. हे ऐकून माझ्या भावाला जाणीव झाली की त्याचं वैयक्तिक आयुष्य असं काही उरलेलंच नाही. तो म्हणाला, ‘मी माझ्या घरात कसा राहतो, काय करतो हे माझ्या बॉसला माहीत असण्याचं काहीच कारण नाहीये. माझ्या वैयक्तिक आयुष्यातला माझा वेळ त्याला माहिती असावा असंही मला अजिबात वाटत नाही. माझ्या कुत्र्याचंही नाव त्याला कळलं आणि ते माझ्यामुळेच कळलं. कारण मीच ते सोशल साइटवर टाकलं होतं. मग माझं असं काहीच राहिलं नाही.’ या विचारांमुळे त्याने फेसबुक अकाउण्ट डिलीट केलं होतं.

माझ्या असं लक्षात आलंय की, आपल्याला आपण बिझी असण्याची सवय लागली आहे. आपण बिझी नसलो तर आपल्याला अस्वस्थ, असह्य़ वाटायला लागतं. एका कॉफी शॉपमध्ये एक खूप छान बोर्ड लावला होता; ‘वी डोण्ट प्रोव्हाइड वायफाय. गेट अ कॉफी अ‍ॅण्ड टॉक टू इच अदर’. ‘फ्री वायफाय अ‍ॅव्हेलेबल’ या हल्लीच्या बोर्डापेक्षा ‘नो फ्री वायफाय’चा आशय असणारा बोर्ड वाचून खरंच बरं वाटलं. आता बहुतांशी ठिकाणी वायफाय असल्यामुळे अशा ठिकाणी तुमचा अर्धा वेळ सोशल मीडियावरच जातो. ट्रेनमध्येही सिनेमांची देवाणघेवाण सुरू असते. प्रत्येक जण आपापल्या मोबाइलमध्ये आपापलं विश्व निर्माण करत असतं. सगळ्यात गंमत मला याची वाटते की एखादा माणूस एवढय़ा जंजाळात असतानाही तो स्टेटस टाकतो ‘फीलिंग लोनली’. अशा वेळी मला इतकंच वाटतं की त्या माणसाला इतकं एकटं वाटत असेल तर त्याने लोकांशी बोलावं, त्यांच्यात मिसळावं. त्याला एकटं वाटतंय हेही तो कुठे सांगतोय तर फेसबुकवर; जिथे असंख्य लोक आहेत. मग तो एकटा कसा काय? हा मुद्दा फक्त फेसबुकपुरता मर्यादित नाही. तर तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या सोयीसुविधांचा अवाजवी वापर इथे अधोरेखित करावासा वाटतो. यामुळेच आपण बिझी असण्याच्या नादात आपलं वैयक्तिक आयुष्य विसरत चाललोय.

परदेशातलंच आणखी एक उदाहरण सांगतो. एकदा एका रेस्टॉरंटमध्ये एक माणूस बिअरचा मोठा जग घेऊन वर्तमानपत्र घेऊन चार तास एकटाच निवांत बसला होता. हा निवांतपणा आपल्याकडे फारसा दिसत नाही. दुसरीकडे एक आजोबा त्यांचा नातू आणि सुनेसोबत एका कॅफेत बसले होते. नंतर ते एका बागेत गेले. त्यांनी त्यांच्यासाठी एक सतरंजी आणली होती. एक बास्केटही होतं. त्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या. दिवसभर त्यांनी तिथे एकत्र वेळ घालवला. वेळ घालवण्याची आपली व्याख्या बदलत चालली आहे. वेळ घालवण्याची माध्यमं आपल्याला पुरत नाहीयेत. सुरुवातीला इंटरनेट होतं तर आता थ्रीजी हवंय, थ्रीजी होतं तर आता फोरजी हवंय, फोरजी होतं तर आता फ्री वायफाय हवं आणि वायफाय होतं तर आता जिओचा प्राइमटाइम फ्री प्लॅन हवाय. या मागण्या वाढतच जातात. इतकं करून शेवटी आपल्या हातात मिळतं काय; तर माहितीचा मोठा साठा. या साठय़ाचा योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात वापर करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. तर अनेकांना या माध्यमाचा, त्यातून मिळालेल्या माहितीचा वापर कसा करावा हे कळतही नाही.

माझ्याकडे मोकळा वेळ असतो तेव्हा फिरायला मॉल्सशिवाय माझ्याकडे दुसरी जागा नाही. कारण तिथे एसी, कॉफी शॉप, थिएटर, शॉपिंग करता येते, लोकांनाही भेटता येतं. सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी असल्यामुळे तिथेच जाणं होतं. बागेसारखी फिरायला अशी कोणती दुसरी जागाच नाही. मध्यंतरी मला माझी एक मैत्रीण भेटली होती. ती तिच्या मुलाला प्ले स्टेशनला सोडायला चालली होती. मी तिला प्ले स्टेशनबद्दल विचारलं. ती म्हणाली की तिथे इनडोअर प्लेइंग अ‍ॅक्टिव्हिटी असते. मुलं बाहेर खेळत असताना त्यांना पावसाचा, उन्हाचा त्रास नको म्हणून या प्ले स्टेशनमध्ये आत खेळता येतं. चिखलात, मातीत खेळणं आपण विसरलोय. धडपडून गुडघे फोडून घेणं विसरलोय, शाळेतून घरी आल्यावर दूध पिऊन कधी एकदा खाली खेळायला जातो असं वाटायचं ते वाटणं विसरतोय. अभ्यास झाला तरच एक मालिका बघता येईल हे रुटीनच आता कुठे बघायला मिळत नाही. सुरक्षिततेच्या नावाखाली लहान मुलांच्या हातात मोबाइल दिला जातो. त्याचा खरा उपयोग त्यांना माहीतच नाही.

या सगळ्यातून आपण स्वत:साठी वेळ काढणं गरजेचं आहे. ही गरज आपण विसरतोय. पण त्याचं महत्त्व वेळीच लक्षात घ्यायला हवं. दिवसातले काही तास मोबाइल, इंटरनेट बंद ठेवू या. वाचन बंद होत चाललंय ते सुरू करू या. त्यासाठी काही प्रयत्न करूया. मी सोशल मीडियावर आहे. मात्र तिथे मी माझ्या कामामुळे जास्त असतो. स्वत:ला वेळ देण्याची गरज मी जाणतो आणि म्हणूनच मी आता माझ्यापुरतं काही गोष्टी ठरवल्या आहेत. मी माझ्या बेडरूममध्ये एक, शूटिंगच्या बॅगेत एक आणि हॉलमध्ये एक अशी तीन वेगवेगळी पुस्तकं ठेवली आहेत. तिथे आल्यावर ते पुस्तक वाचायचा मोह व्हावा म्हणून ही कल्पना सुचली. हॉलमध्ये आल्यावर टीव्ही सुरू करण्याआधी मला ते पुस्तक दिसतं, मग ते वाचावं असं वाटतं. असे छोटे छोटे उपाय करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडिया वाईट किंवा तंत्रज्ञान चुकीचं असं मला अजिबात म्हणायचं नाही. या सगळ्यापासून संन्यास घ्या असंही माझं म्हणणं नाही. पण कुठे थांबावं हे प्रत्येकाला कळायला हवं. ही जाणीव स्वत:ला करून देण्यासाठी छोटय़ा गोष्टींपासून सुरुवात करायला काय हरकत आहे. सहज म्हणून कोणाच्या घरी जाणं, नातेवाईक आजारी म्हणून त्याला भेटणं, कोणाला तरी फोन करून गप्पा मारणं याचा विसर पडतोय. भेटणं कमी झालंय. त्यापेक्षा एखादा मेसेज, कॉलचा पर्याय आपल्याला मोहात पाडतो. भेटण्यासाठी करावा लागणारा प्रवासाचा त्रास एखाद्या मेसेज कॉलने कमी होत असेल तर तेच करूया असा विचार करून अनेक जण त्याकडेच झुकतात. पण हे भेटणं सध्या खूप महत्त्वाचं झालंय. खऱ्या भेटण्यातली गंमत पुन्हा एकदा अनुभवण्याचा प्रयत्न तर करूया आणि खऱ्या जगण्याचा आनंद घेत स्वत:साठी थोडा वेळ काढूया.

अभिजीत खांडकेकर – response.lokprabha@expressindia.com
शब्दांकन : चैताली जोशी
सौजन्य – लोकप्रभा

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-04-2017 at 09:31 IST