बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीची सध्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मुलाचे निधन झाल्याचे म्हटले आहे. सेलिनाने ‘वर्ल्ड प्री-मॅच्युअरीटी डे’च्या निमित्ताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सेलिनान १७ नोव्हेंबर रोजी वर्ल्ड प्री-मॅच्युअरीटी डे निमित्त पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या जुळ्या मुलांपैकी एका मुलाचा लहानपणी मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये तिने त्या बाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.

‘१७ नोव्हेंबर २०११ पासून वर्ल्ड प्री-मॅच्युअरीटी डे साजरा केला जातो. या दिवशी वेळेपूर्वीच म्हणजेच सातव्या किंवा आठव्या महिन्यांमध्ये अनेक लहान बालकांचा जन्म होतो त्यांच्या विषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. मुलांचा प्री- मॅच्युअर जन्म ही खूप मोठी समस्या आहे. पण जे माता-पिता NICU मध्ये आहेत त्यांना मी आणि माझा पती पीटर सांगू शकतो की आता गोष्टी बदलल्या आहेत’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे तिने ‘मी माझ्या एका मुलाला NICU मध्ये मृत्यूशी झुंज देताना पाहिले आहे आणि दुसऱ्या मुलाचे निधन झाल्याचे पाहिले. पण NICU मध्ये डॉक्टर आणि नर्स यांनी आमची खूप मदत केली. त्यांनी योग्य ते उपचार दिले. त्यांनी माझा मुलगा अर्थर लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रयत्न केले’ असे म्हटले आहे.

सेलिनाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘अपना सपना मनी-मनी’, ‘जानशीन’, ‘नो एण्ट्री’, ‘थँक यू’, ‘खेल’, ‘शका लका बूम-बूम’, ‘पेइंग गेस्ट’, ‘टॉम , डिक अॅण्ड हॅरी’, ‘मनी है तो हनी’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.