चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने सोमवारी ‘पीके’ चित्रपटातील काही दृश्यांवर प्रदर्शनापूर्वीच आक्षेप नोंदविला असल्याचा गौफ्यस्फोट केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आमिर खान आणि राजू हिराणींचा ‘पीके’ नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चित्रपटातील काही दृश्ये आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे सेन्सॉर बोर्डचे सदस्य सतिश कल्याणकर यांनी सांगितले. मात्र, नंतरच्या काळात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. सेन्सॉर बोर्डाच्या काही सदस्यांनी सोमवारी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट दिली. शंकराचार्यांनी ‘पीके’ हा चित्रपट हिंदू समाजाच्या भावना दुखावत असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना कल्याणकर यांनी आपण ‘पीके’तील काही दृश्यांविषयी असलेले आक्षेप लिखित स्वरूपात बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवल्याचे सांगितले. मात्र, चित्रपटातून ही दृश्ये न वगळताच चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याचे कल्याणकर यांनी सांगितले. चित्रपट स्क्रिनिंग समितीचे सदस्य असलेल्या कल्याणकर यांच्या मते चित्रपटाने काही नियमांचे उल्लंघन केल्याचेही म्हटले. आता ‘पीके’च्या सेन्सॉरशिपविषयीच नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, चित्रपटाने याअगोदरच बॉक्स ऑफिसवर अपेक्षित नफा मिळवला आहे.
यापूर्वी ‘पीके’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना हटविण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी सेन्सॉर बोर्डाने धूडकावून लावली होती. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी ‘पीके’मध्ये कोणतेही दृश्य आक्षेपार्ह नसून हा चित्रपट आता प्रदर्शित झाल्याचे म्हटले होते.