मुंबई : खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार, १५ मे रोजी दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे आपला शतकमहोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. ‘आमने सामने’मध्ये लग्नसंस्थेवर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. या शतकमहोत्सवी प्रयोगाला ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता-कवी जितेंद्र जोशी, आरजे दिलीप, दिग्दर्शक रवी जाधव, लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
झी नाटय़गौरव आणि म. टा. सन्मान सोहळ्यांत सर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि साहाय्यक अभिनेत्री या पुरस्कारांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे. आगामी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांमध्येसुद्धा सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, साहाय्यक अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशी आठ नामांकने या नाटकाने पटकावली आहेत. विशेष म्हणजे ‘आमने सामने’ची आगामी आंतरराष्ट्रीय संमेलनांतही निवड झाली असून, यानिमित्ताने नाटकाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. ऑगस्टमध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी अटलांटिक सिटी येथे होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २२, २३, २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात या नाटकाची निवड झाली आहे.
मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या ‘आमने सामने’मध्ये मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा, हा विचार रंजकरीत्या मांडलेला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी या नाटकात लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती ‘नाटक मंडळी’ या नाटय़संस्थेने केली आहे.
