बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमी तिच्या चित्रपटांसोबतच हटके आणि आकर्षक स्टाइलसाठीही चर्चेत असते. सध्या अनुष्का ही सिनेसृष्टीपासून दूर आहे. अनुष्का शेवटची २०१८ मध्ये आनंद एल राय दिग्दर्शित झिरो चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट साईन केला नाही. ती तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करत होती. यानंतर अनुष्का गरोदर राहिली आणि आता तिच्या मुलीला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्का चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामी हिच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारीत ‘चकडा एक्‍सप्रेस’ चित्रपट येत आहे. या चित्रपटातून अनुष्का अभिनयाच्या जगात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने सांगितले की, या चित्रपटासाठी तिला तिचा पती विराट कोहलीकडून फलंदाजीच्या टिप्स मिळाल्या. आम्ही कायम माझ्या कामातील प्रगतीबाबत चर्चा करतो. जेव्हा मी नविन काही शिकते, तेव्हा मी माझे व्हिडीओ विराटसोबत शेअर करते आणि त्याचा फीडबॅक मिळवते. सुदैवाने, तो गोलंदाज नाही म्हणून मी माझ्या प्रशिक्षकाचे जास्त ऐकते. पण फलंदाजीच्या टिप्स मी विराटकडून घेते.” क्रिकेट खेळताना शारीरिकदृष्ट्या त्रास होतो का? याविषयी तिने आपलं मत माडलं. “क्रिकेट खेळताना मानसिक दडपण येऊ शकते याचे मला नेहमीच कौतुक वाटायचे, पण ते किती शारीरिकदृष्ट्या थकवणारे आहे, हे कळलं.” अनुष्काने या वर्षी मार्चमध्ये सखोल क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले होते. तिच्या प्रशिक्षण सत्रातील व्हिडीओ देखील शेअर केले होते.

अनुष्का अनेकदा क्रिकेट सामन्यांना उपस्थित असते, स्टँडवरून तिचा पती विराटला प्रोत्साहन देताना दिसते. २०२० मध्ये, अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती “अय कोहली, आये कोहली! चौका लगा ना,” असे म्हणताना दिसत होती. चकडा एक्सप्रेसचे दिग्दर्शन प्रॉसिट रॉय करणार असून अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्झने त्याची निर्मिती केली आहे.