scorecardresearch

चंदन प्रभाकरचा कपिल शर्मा शो सोडल्याचा दावा खोटा; पहिल्या भागात केली इडलीवाल्याची भूमिका

अभिनेता चंदन प्रभाकरने द कपिल शर्मा शो करत नसल्याची घोषणा केली होती.

चंदन प्रभाकरचा कपिल शर्मा शो सोडल्याचा दावा खोटा; पहिल्या भागात केली इडलीवाल्याची भूमिका
चंदन प्रभाकर कपिल शर्मा शोमध्ये 'चंदू चायवाला' हे पात्र साकारायचा.

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरचा सुपरहिट कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ चर्चेत आहे. कपिल शर्माचा हा शो मागील पाच-सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम काही महिन्यांपूर्वी परदेश दौऱ्यावर गेले होते. या परदेश दौऱ्यामुळे कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे चार-पाच महिन्यानंतर या कार्यक्रमाचे नवे पर्व येणार असल्याची माहिती समोर आली. टीआरपीच्या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या या शोचे नवे पर्व वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आले आहे.

गेल्या आठवड्यात कपिल शर्मा शोचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. अभिनेता अक्षय कुमार त्याच्या ‘कटपुतली’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला होता. त्याच्यासह रकुल प्रीत सिंह, सरगुन मेहता या कलाकारांनी देखील शोला हजेरी लावली होती. नव्या पर्वानुसार कपिल शर्मा शोमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. काही जुन्या कलाकारांच्या जागी नव्या कलाकारांची निवड केलेली आहे. तसेच कार्यक्रमाचे स्वरुप सुद्धा बदलण्यात आले आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या कृष्णा अभिषेकने शो सुरु होण्यापूर्वीच सोडल्याचे स्पष्ट केले होते. ‘कार्यक्रमाच्या करारामधील त्रुटींमुळे मी कपिल शर्मा शो सोडायचा निर्णय घेतला आहे’ असे म्हणत कृष्णाने स्वत:ची बाजू मांडली. कृष्णानंतर भारती सिंहने देखील कार्यक्रमामध्ये सहभागी होत नसल्याचे सांगितले. ती सध्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामुळेच तिने कपिल शर्मा शो सोडल्याची माहिती समोर आली आहे. या दोन कलाकारांपाठोपाठ अभिनेता चंदन प्रभाकरने शो करत नसल्याची घोषणा केली होती. पण नव्या पर्वाच्या पहिल्या भागामध्ये चंदन थोड्या कालावधीसाठी दिसला. चंदन प्रभाकर कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ हे पात्र साकारायचा. पण नव्या पर्वात तो इडलीवाला बनून शोमध्ये सहभागी झाला. त्याच्या या नव्या पात्राची पत्नी देखील शोमध्ये दाखवण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे कपिल शर्मा शोचे चाहते चक्रावले आहेत. काहींनी चंदनने शो सोडल्याचा खोटा दावा केला असल्याचे म्हणत त्याला ट्रोल केले आहे. काही प्रेक्षकांनी चंदनने प्रोमो आणि सुरुवातीचे काही भाग चित्रीत झाल्यानंतर शो सोडायचा निर्णय घेतला असावा असा तर्क लावला आहे.

आणखी वाचा – “ती तुझ्या आवाक्याबाहेर…” रणवीर सिंगने भर कार्यक्रमात विकी कतरिनाच्या लग्नाची उडवली खिल्ली

द कपिल शर्मा शोचे नवे पर्व १० सप्टेंबर पासून सुरु झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandan prabhakar appeared in the first episode of the kapil sharma show yps