बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी राज कुंद्राची या प्रकरणी जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र अद्याप शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपता संपत नाही. नुकतंच मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खान यांच्याविरोधात हा फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण २०१४ मधील आहे. प्रसिद्ध व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार, राज आणि शिल्पा यांनी त्या संबंधित व्यावसायिकाकडून यांची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
त्या व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मला फिटनेस संबंधित एका व्यवसायात १ कोटी ५१ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. ही गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षांनी याबाबत काहीही सुरळीत न झाल्याने मी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी मला धमकी दिली, असा आरोप त्याने केला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४, १२०(ब) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांनी जामिनावर सुटका
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा चर्चेत आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला १९ जुलै महिन्यात अटक केली होती. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी २० सप्टेंबरला पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा मिळाला होता. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टानेकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला होता. त्यासोबत राज कुंद्राचा साथीदार आणि या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार असलेल्या रायन थोरोपेलाही जामीन मिळाला आहे.