Chetak Screen Awards : हिंदी चित्रपटांमधील गाणी आणि त्यातील डान्स स्टेप्सही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’मध्ये विजय गांगुलीला ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ या गाण्याच्या व्हायरल डान्स स्टेप्ससाठी बेस्ट कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला.
या विभागात इतरही अनेक गाण्यांना नामांकनं होती. Bosco Leslie Martis यांना ‘आझाद’ मधील ‘उई अम्मा’ आणि ‘देवा’ मधील ‘भासाड मचा’ या गाण्यांसाठी दोनदा नामांकन मिळाले होते. तर विजय गांगुलीला ‘थामा’मधील “दिलबर की आँखो का” या गाण्यासाठीही नामांकन मिळाले होते. तसेच गणेश आचार्य यांना ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मधील गाण्यासाठी नामांकन मिळाले होते.
काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या भव्य सोहळ्यात अर्शद वारसी यांनी विजेत्याला पुरस्कार प्रदान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलिया भट्ट, झाकीर खान आणि सुनील ग्रोवर यांनी केलं होतं. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ तर्फे सुरू करण्यात आलेले चेतक स्क्रीन अवॉर्ड्स हे गुणवत्तेच्या आधारे, प्रामाणिकपणा आणि सहकाऱ्यांच्या सन्मानाच्या निकषांवर कलाकारांचा गौरव करणारे पुरस्कार आहेत.
चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६मधील नामांकित कलाकार आणि विजेत्यांची निवड स्क्रीन अकॅडमीने केली. ही ५३ प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेली स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. स्क्रीन अकॅडमीमध्ये अनेक नामवंत कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. यामध्येप्रसेनजित चॅटर्जी, आरएस प्रसन्ना, राजीव मेनन, राजकुमार हिरानी, रेसुल पूकुट्टी, शूजित सरकार, दीपा मेहता, श्रीराम राघवन, राम माधवानी, गुनीत मोंगा कपूर, जॉन अब्राहम, कबीर खान, करण जोहर, मुकेश छाब्रा, पायल कपाडिया, रिमा दास आणि विद्या बालन.
लॉस एंजेलिसमधील University of Southern California School of Cinematic Arts येथे सिनेमा आणि मीडिया स्टडीज विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. प्रिया जयकुमार यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. स्क्रीन अकॅडमीमध्ये स्कॉलर-इन-रेसिडेन्स म्हणून काम करताना त्यांनी सदस्यांना गुणांकनासाठी मार्गदर्शन करणारी सविस्तर नियमावली तयार केली होती. सुरुवातीच्या शॉर्टलिस्टनंतर स्क्रीन अकॅडमीने मतदानाद्वारे चित्रपटांचे मूल्यमापन केले.
