Chhapaak Movie Review : काळजाला भिडणारी ‘रिअल स्टोरी’

“उसने मेरी सुरत बदली है, मेरा मन नहीं”

शर्वरी जोशी

कथा तिची, तिच्या संघर्षाची आणि तिने न्याय मिळवण्यासाठी केलेल्या कसोशीच्या प्रयत्नांची. अर्थात ही कथा आहे मालती अगरवालची(दीपिका पदुकोण). ऐन तारुण्यात भविष्याची स्वप्न रंगवणाऱ्या तिचं आयुष्य एका घटनेनंतर पार बदलून जाते. आयुष्यात कधी विचारही केला नसेल अशी घटना मालतीसोबत घडते. अ‍ॅसिड हल्ला झाल्यानंतर मालतीचा चेहरा पूर्णपणे बदलतो. मात्र त्या परिस्थितीमध्येही ती उठते, लढते. विशेष म्हणजे संघर्षाच्या काळातही तिच्या चेहऱ्यावर हसू कायम असतं. यातूनच तिचा आत्मविश्वास झळकतो. देशात अनेक महिला अ‍ॅसिड हल्ल्याच्या शिकार होतात. मात्र आजही अ‍ॅसिडच्या विक्रीवर बंदी नाहीये. ते स्वस्त दरात बाजारात सहज उपलब्ध होतं. परंतु ज्याची काडीमोल किंमत आहे अशा अ‍ॅसिडचे परिणाम किती घातक आहेत हे या चित्रपटातून प्रकर्षाने दाखविण्यात आलं आहे. अ‍ॅसिड हल्ल्याचा त्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम ‘छपाक’मधून सादर करण्यात दिग्दर्शिका मेघना गुलजार यांना यश आलं आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

१९ वर्षांची मालती. अगदी सामान्य कुटुंबात वाढलेली. स्वप्नही तशीच पाहिलेली. अगदी तुमच्या-आमच्या सारखीच. खरंतर सौंदर्य ही मुलींना लाभलेली देवाची देणगी असते. मात्र कधी-कधी हेच सौंदर्य त्यांच्या अडचणीचं कारणं ठरतं आणि तेच मालतीच्या बाबतीत घडताना दिसतं. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मालतीच्या अंगावर बशीर खान ऊर्फ बब्बू अ‍ॅसिड फेकतो. प्रेम,वासना, इर्षा या साऱ्यामुळे तो तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करतो. ज्यामुळे मालतीचं संपूर्ण जीवन विस्कळीत होतं. या घटनेनंतर करिअरची स्वप्न पाहणारी मालती न्याय मिळण्याची स्वप्न पाहते आणि इथूनच तिचा संघर्ष सुरु होतो. अ‍ॅसिडच्या विक्रीवर बंदी यावी यासाठी ती बरेच प्रयत्न करते. या प्रवासात तिच्यासोबत अनेक नवीन माणसं जोडली जातात. विशेष म्हणजे याच प्रवासात तिला तिचं प्रेम गवसतं. मात्र तिचा हा प्रवास कसा झाला, कोणत्या अडचणी आल्या आणि त्या साऱ्यावर तिने कशी मात केली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शकांचं कौशल्य?

‘तलवार’, ‘राझी’ या सारख्या दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या मेघना गुलजार यांनी ‘छपाक’ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. प्रत्येक चित्रपटानंतर मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाची एक एक पायरी उंचावताना दिसते. ‘छपाक’ या चित्रपटाद्वारे त्यांनी एका वेगळ्या विषयात हात घातला आहे.

काय आहे दीपिकाच्या अभिनयातील खासियत?

विशेष म्हणजे, चित्रपटाचा खरा हिरो ही कथाच असल्याचं दिसून येतं. या चित्रपटात अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणीची व्यथा, तिचा त्रास दीपिका पदुकोणने उत्तम प्रकारे पडद्यावर साकारला. तिच्या अभिनयाची ताकद पाहून चित्रपटात दाखविण्यात आलेला प्रत्येक क्षण ती जगल्याचं जाणवतं. अ‍ॅसिड फेकल्यानंतर जेव्हा मालती पहिल्यांदा तिचा चेहरा आरशात पाहते त्यावेळी ती ज्या जीवाच्या आकांतने ओरडते तो आवाज काळजाला भिडतो. तिच्या भावना थेट काळजाला भिडतात आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चित्रपटात दीपिका न दिसता खरंच डोळ्यासमोर लक्ष्मी अगरवाल उभी राहते.

कसा आहे विक्रांत मेस्सीचा अभिनय?

दीपिकाप्रमाणेच या चित्रपटात लक्षवेधी चेहरा ठरला तो म्हणजे अभिनेता विक्रांत मेस्सीचा(अमोल). अ‍ॅसिड  हल्लाग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी एक एनजीओजी चालवणारा तरुण. छोट्या पडद्यावर बऱ्याच वेळा वावर असणाऱ्या विक्रांतने या चित्रपटातून एक वेगळीच छाप उमटवली. भूमिका लहान असली तरी लक्षात राहण्यासारखी आहे.

चित्रपटातील गुणवैशिष्ट्य काय ?

कलाकारांच्या अभिनयाप्रमाणेच चित्रपटातील अनेक बारकाव्यांवर लक्ष देण्यात आलं आहे. तसंच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबच संवाद आणि संगीतावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. चित्रपटाचं टायटल साँग मनाला भिडतं आणि चित्रपटाची खोली त्यातून प्रकर्षाने जाणवते. खासकरुन या चित्रपटात मालतीचे काही संवाद लक्षात राहण्यासारखे आहेत.त्यातलाच “उसने मेरी सुरत बदली है, मेरा मन नहीं”, हा संवाद तिच्यातील आत्मविश्वास दाखवतो. या चित्रपटातून न्यायव्यवस्थेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. जातीव्यवस्था, एकतर्फी प्रेम किंवा अन्य वादांमुळे अनेक महिला अ‍ॅसिड हल्ल्याच्या बळी पडल्याचं या चित्रपटातून प्रकर्षाने जाणवतं.

काय जाणवतात चित्रपटातील उणिवा?

चित्रपटाचा पूर्वार्ध थोड्या धिम्या गतीने पुढे सरकतो. त्यामुळे सुरुवातीला चित्रपट थोडासा कंटाळवाणा वाटतो. मात्र उत्तरार्धामध्ये लक्ष्मीच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो. तसंच मालतीची परिस्थिती हालाखीची असतानादेखील ती वापर असलेली पर्स एका दर्जेदार कंपनीची असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या हा विरोधाभास चित्रपटात दिसून येतो. हा चित्रपट मनोरंजन करणारा नसला तरी समाजात घडणाऱ्या हिंसक गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांची नजर त्यावर खिळून राहताना दिसते.

शर्वरी जोशी

sharvari.joshi@loksatta.com

लोकसत्ता ऑनलाइनकडून ‘छपाक’ला साडेतीन स्टार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhapaak movie review deepika padukone starrer hindi movie ssj