डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रानू मंडल रातोरात स्टार झाल्या होत्या. कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाने त्याच्या चित्रपटामध्ये रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली. मात्र, नंतर रानू या इंटस्ट्रीमधून गायब झाल्या. आता त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बिहारमध्ये सध्या सर्वात मोठा सण मानल्या जाणाऱ्या छठपूजेची तयारी जोरदार पद्धतीने सुरु आहे. या दरम्यान रानू मंडलच्या छठ पूजेनिमित्त गायलेल्या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यात रानू मंडल ही हातात सूप घेऊन प्रार्थना करताना दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा रानूने अशाप्रकारे छठ पूजेचे गाणे गायलं असून यावर सध्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.

सध्या तिने गायलेले हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या गाण्याला आतापर्यंत १४ लाख ६४ हजार ५९ व्ह्यूज आहेत. दरवर्षी छठ पूजेदरम्यान भोजपुरी गायिका शारदा सिन्हा हिची गाणी प्रसिद्ध असतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा रानूने छठ पूजेचे गाणं गायलं आहे. पण यात कुठेही रानू मंडल ही गाताना दिसत नाही. त्यामुळे हे गाणं नक्की तिने गायले आहे की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

दरम्यान हे गाणे ऐकणाऱ्या बऱ्याच जणांनी हा आवाज रानूचा नाही, अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी याबाबत रागही व्यक्त केला आहे. “फक्त लाईक्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही कोणाच्याही नावाचा वापर करु शकत नाही. हा आवाज रानू मंडलचा नाही,” अशी कमेंट्ही एका नेटकऱ्याने केली आहे. त्यामुळे नेमकं हे गाणे कोणाचे आहे? ते रानूने गायलं आहे की नाही? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.