छाया कदम मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक दर्जेदार मराठी कलाकृतींमध्ये काम करत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. छाया कदम यांनी हिंदीतही त्यांच्या अभिनयाची छाप सोडत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण कली. अशातच त्यांनी बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
छाया कदम यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शिक आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट. अशातच छाया कदम यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान संजय लीला भन्साळींना सीन न आवडल्याने पुन्हा शूटिंग करावं लागल्याचा किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळी यांची सेटवर काम करण्याची पद्धत कशी आहे याबद्दलही सांगितलं आहे.
छाय कदम यांना तुम्ही एखाद्या सीनसाठी तयारी केली आहे पण, ऐनवेळी त्यात बदल करण्यात आलाय का असं कधी तुमच्याबरोबर घडलंय का असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “हो बऱ्याचदा असं होतं, की आम्ही कलाकार आमची आमची तयारी करुन जातो की हा सीन असा होईल, तो सीन असा करता येईल. काहीवेळेला आम्ही ठरवलेलं असतं तसं होतं पण, काहीवेळेला जे ठरवलेलं असतं त्याच्या अगदी उलट होतं.”
छाया कदम यांनी सांगितला संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याचा अनुभव
छाया कदम यांनी पुढे ‘गंगूबाई चित्रपटाच्या सेटवरचाच एक किस्सा सांगितला त्या म्हणाल्या, “असे अनेक किस्से आहे, पण गंगूबाईच्यावेळी असं झालं होतं. एका सीनदरम्यान मी बेडवर झोपले होते. केस मोकळे होते. पण त्याआधी एक सीन शूट झाला होता वेगळ्या पद्धतीने. मी जेवण बनवत असते आणि दुसरी मुलगी येऊन माझ्याशी बोलत असते. पूर्ण रात्रभर आम्ही त्याचं शूटिंग केलं पण संजय सरांना ते आवडतंच नव्हतं.”
छाया कदम पुढे म्हणाल्या, “मग दोन तीन दिवसांनंतर पुन्हा तो सीन शूट झाला. तेव्हा त्यांनी मला आणि इतरांनाही विचारलं की छाया जी तुम्हाला काय वाटतं या सीनमध्ये तुम्ही नक्की काय करणं योग्य वाटेल. त्यावर मी म्हणाले मी त्यांची बॉस आहे मग मी जेवण का बनवू ना त्यापेक्षा मी बसलेली असेन आणि मुली माझ्या डोक्याचा मसाज करत असतील मग तो सीन तसाच शूट झाला. संजय सर असंच प्रत्येकाला विचारत असतात त्यांची मतं जाणून घेत असतात.” संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल छाया कदम पुढे म्हणाल्या, “संजय सर फक्त दिग्दर्शक नाहीये ते नृ्त्य दिग्दर्शक, गायक सगळे गूण आहेत. ते अष्टपैलू आहेत.” गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.
